तुरुंगात 3
'तुम्ही लग्न करणार वाटते?' वृध्द म्हणाला.
'हो.' विजयने उत्तर दिले.
'चांगले आहे, मुक्तालासुध्दा मी सांगतो; परंतु ती ऐकत नाही. का ग मुक्ते. खरे ना?' पिता म्हणाला.
'विजय, भात वाढू का थोडा?' लक्ष न देता मुक्ताने विचारले.
'नको. पोट भरले. आता उठतो.' हसून विजयने उत्तर दिले. विजय उठला. मुक्ताने त्याला विडा दिला.
'मी खात नाही.' तो म्हणाला.
'मी मुद्दाम करून ठेवला होता. तुम्हाला संन्यासी नाही ना व्हायचे? संसार ना करायचा आहे? लग्न ना करायचे आहे? मग खायला काय हरकत? घ्या.' ती म्हणाली.
'कोठून ग आणलास?' पित्याने विचारले.
'रुक्माकाकांकडून' ती म्हणाली.
'हा कोण रुक्माकाका?' विजयने विचारले.
'तो एक जुना शिपाई आहे. पूर्वी राजाच्या सैन्यात होता. आता घरी असतो. फार विनोदी. त्याला पान खाण्याची फार सवय. आम्हाला मोठा आधार आहे.' मुक्ताच्या पित्याने सांगितले.
'तुम्ही जेवा. मला पोचवायला येणार आहात ना?' विजयने विचारले.
'हो.' ती आनंदाने म्हणाली.
मुक्ताने पटापट चार घास खाल्ले. ती तयार झाली. इतक्यात रुक्माकाकाही आले.