मृत्यूचे काव्य 2
: पाच :
प्रिय नारायण
तुलाच बाळ हे पत्र. तू भेटलास माझे काम पुढे चालवायला. मी मनाने व शरीरानें अस्वस्थ आहे. झोपेचे औषध घेऊन पडत आहे. चिरझोंप लागली तर? मधूला म्हणावे खान्देशांत जा. माझा शेवटचा निरोप सांग की लोकशाही, सत्याग्रही समाजवाद हे ध्येय धरा. तें तारील. खान्देशचा मी चिरॠणी आहे. त्यांनी माझ्या नावे पैसे जमवले असतील तर ते कामाला घ्या. नारायण, तू परीक्षेत नापास म्हणून मला वाईट नाही वाटत. तूं गुणी आहेस. साधना प्रेस चालवा. दू रावसाहेब पटवर्धनांस साधनेचे संपादक व्हायला गळ घाल. प्रिय वसंता व यदु सहसंपादक नाहीतर वसंता संपादक, यदू सहसंपादक. सारे मिळून चालवा. तू आजोबांजवळून थोडे भांडवल माग वेळच पडली तर.
प्रिय सुधाच्या शिक्षणाबद्दल डॉ. रामभाऊंस सांग. प्रिय अप्पास मदत लागली तर प्रेसमधून प्रेस चालला, साधना चालली तर देत जा.
वसंता, यदू, गजानन जोशी, रावसाहेब, मधू, डिच्चू, राजा कुलकर्णी, एस. एम्., रावसाहेब, अच्युतराव सारे मिळून साधना सुंदर चालवाल. विविधता आणाल. मी मनानें तुमच्यांत राहीन. श्रीरंगला अपार कष्ट माझ्यामुळे. माधव आंबे तुम्ही सर्व, कृतज्ञ व आभारी. खोलींतील सर्वांचा ॠणी. सर्वांचे स्मरण व मंगल चिंतून झोपी जात आहे. जर शेवट झाला तर गुपचूप हार्टफेल डिक्लेअर करा. म्यु. गाडी आणा. चार जणास कोणाला कळवू नका. अप्पांचे समाधान करा. साधनेतून द्यालच. इतर वर्तमानपत्रांना कळेल. कोणासही तुम्ही कळवू नका. खोलीतील चार पुरेत.
डोक्यांत असह्य वेदना. काय करू? जवळच्या झोपेच्या गोळया घेत आहें. झोप लागेल का? का चिरनिद्रा लागेल? तसें झालें तर चुकल्या माकल्याची क्षमा करा.
चित्रशाळेला एक हजार रुपयांसाठीं पुस्तकें लिहून न झाल्यामुळे त्यांना 'विनोबा व देशबंधु दास' ही पुस्तकें त्या रकमेंत कायमची विकत घ्यायला सांगून कृपाकरून म्हणावे ॠणमुक्त करा. साधनेला ज्यांचे देणे आहे त्यांना प्रेसला ती देणगी द्या म्हणून माझ्या वतीनें विनवा. आंतरभारतीसाठी हजार अकराशे रुपये जमले. तेवढयात काय करणार?
श्री. शहाणे यांस दोनशें रुपये पाठवा. म्हणजे ते मराठींतून कन्नड अनुवाद करतील. इतर पैशांतून एखादा कन्नड ग्रंथ अनुवादून घ्यावा. तो छापावा. विकून पैसे आले तर दुसरा छापावा. अनुवादकाला मोबदला द्यावा. लेखकासही हक्कासाठीं. निरनिराळया भाषेंतून असे अनुवाद करवून घ्यावेत. ''आन्तरभारती मला'' असें नांव द्यावे. मराठीतीलहि इतर भाषेंत करवावेत.