संतांचा मानवधर्म 12
असे तो पुकारतो. परंतु आम्ही सारे बहिर्द्दष्टि. हृदयची श्रीमंती कोण ओळखणार?
एका भांडखोर माणसाने एकदा एकनाथांस विचारले, ''तुम्ही कसे शांत असता? आमच्याजवळ तिळभरही शांति नसते.'' नाथ म्हणाले, ''ते सारे जाऊ दे. तू आठ दिवसांनी कदाचित् देवाघरी जाशील.'' ''काय मी मरणार? आठ दिवसच राहिले?'' असे म्हणून तो मनुष्य घरी गेला. शेजार्या पाजार्यांची तो क्षमा मागू लागला. ज्यांच्या ज्यांच्याजवळ तो भांडला होता, ज्यांना ज्यांना त्याने तुच्छ मानले होते त्या सर्वांची त्याने क्षमा मागितली. बायकोची क्षमा मागतो. उगीच मारले म्हणून मुलांच्याजवळही क्षमा मागतो. एके दिवशी नाथ त्याच्याकडे आले. म्हणून माणसाने विचारले, ''आली का वेळ? भरली का घटका?'' नाथ म्हणाले, ''ते मला काय माहीत? परंतु हे तुझे आठ दिवस कसे गेले? किती जणांजवळ भांडलास?'' तो म्हणाला, ''नाथ, कसले भांडण नि काय? समोर सारखे मरण होते. सर्वांची क्षमा मागत होतो.'' नाथ म्हणाले, ''आम्ही नेहमी माणसाचे स्मरण ठेवतो. सर्वांना प्रेम देतो. कशाला अहंकार? भांडणे?'' बंधूनो, हरिजनांना दूर ठेवून का तुम्हाला मोक्ष मिळणार आहे? स्वतःला उच्च मानता; परंतु दुसर्यांस तुच्छ मानून स्वतःला उच्च समजणार्यांस गीतेने आसुरी म्हटले आहे.
आपण बंधुभाव ओळखीत नाही. धर्माचा आत्मा जाणत नाही. मानवतेशी आपण पारखे झालो आहोत. आपण सत्ता ओळखतो. दंडुक्यासमोर मान लववितो. मुसलमान बंधू तुमच्या विहिरीवर पाणी भरू शकतात. तुमच्या ओटीवर बसतात. तुम्ही त्यांना प्रेमाने सुपारी, पान देता. परंतु हरिजन मात्र तुम्हाला चालत नाही. तुम्ही मुसलमानास येऊ देता हे चांगले आहे. परंतु त्यांनाही हा हक्क तुम्ही प्रेमाने दिलेला नाही. मुसलमान येथे शेकडो वर्षे राज्यकर्ते होते. त्यांनी तो हक्क मिळविला, सत्तेसमोर तुम्ही वाकलेत.
नदी सारे प्रवाह घेऊन मोठी झाली. हा समुद्र अनंत प्रवाह घेऊन अमर झाला; सारखा उचंबळत आहे, असा विचार डोक्यात येऊन सारे मानवी प्रवाह जवळ घ्यायला आपण तडफडावे. या भारतात एक मानवी प्रवाहांचे तीर्थक्षेत्र होवो असे रवींद्रनाथ म्हणत. आपण या देशाला शतखंड केले आहे. हिंदू-मुसलमान दूर राहिले. हिंदु-हिंदूत किती डबकी. ब्राह्मण, मराठे, साळी, माळी शेकडो प्रकार. जातीच्या पलिकडे पाहण्याची दृष्टीच नाही. तू कोठे पाणी प्यायलास, याहून महत्त्वाची जणू जगात दुसरी वस्तु नाही. ही सारी डबकी फोडा, डबकी झाली तर हिवताप, डास, मरण. या देशांत भेदांची डबकी माजवली. राष्ट्रावर प्रेतकळा आली. ज्या देशातील लोक एकमेकांवर डोळे वटारतात, शिंगे उगारतात, त्यांच्या पाठीवर मृत्युदेव बसतो. यमाचे वाहन रेडा आहे. याचा हाच अर्थ. फोडा डबकी. एक विशाल मानवी प्रवाह करा. जातिभेदाचे बुजबुजाट पुरे.