सर्वोद्य व अनाग्रही निष्ठा 3
प्रश्न : सर्वोदय समाज कोणत्या पक्षाचा नाही तरी तुम्हा का पसंत नाही?
उत्तर : सर्वोदयासाठी जे आर्थिक धोरण हवे असे मला वाटते, ते स्वीकारायला सर्वोदय समाज आज तयार नाही. शिवाय श्री. राजेन्द्रबाबू जरी म्हणाले की सर्वोदय समाज पक्षीय राजकारणापासून अलिप्त आहे, तरी श्री. शंकरराव देवांचे लेख निराळे सांगतात. श्री. शंकरराव देव म्हणतात, 'सर्वोदयाचे राजकारण काँग्रेस मार्फत चालेल.' उद्या समजा, निवडणुका आल्या आणि मी सर्वोदयचा सभासद असूनही समाजवादी पक्षास मते द्या म्हटले किंवा प्रचारले तर मला सर्वोदयाचा सभासद म्हणून ठेवतील काय? मला गचांडी मिळेल. राजकारणात सर्वोदयातील लोकांनी काँग्रेसलाच पाठिंबा द्यावयाला हवा. म्हणजे सर्वोदय समाजही राजकारणात पक्षनिष्ठच राहील असे वाटते. १९३८मध्ये त्रिपुरीला काँग्रेस भरली होती. त्या वेळी महत्त्वाच्या प्रश्नावर मतमोजणी व्हायची होती. म्हणून ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या आपआपल्या सर्व सभासदांना प्रत्येक पक्ष आणीत होता. तारेने पैसे पाठवून अनेक सभासदांना बोलवण्यात आहे. माझा एक तरुण मित्र एका खादी भांडारात होता. तो म्हणाला, 'गुरुजी, माझी इच्छा असो नसो, मला सांगतील तसंच मत दिलं पाहिजे.' अशी ही गुलामी येते. माझे एक मित्र हरिजन सेवा संघात काम करतात. त्यांनी खेडेगावात साधना घेत जा असे सांगितले, म्हणून त्यांना ठपका देण्यात आला! साधनेत हिंदू मुस्लिम ऐक्यावर, जातीय ऐक्यावर, अस्पृश्यतेवर, स्वच्छता-सफाईवर, शिक्षण पध्दतीवर वगैरे किती जरी आले तरी समाजवादी प्रचार त्यात असतो. म्हणून साधना या लोकांना शापरूप वाटते! अशी ही अनुदारता आहे. ही सर्वोदय समाजातही कशावरून नसणार? काँग्रेसच्या आर्थिक व इतर धोरणास तो पाठिंबा देणारच. मी तेथे बहिष्कृतच रहावयाचा.
प्रश्न : श्री. शंकरराव देव सर्वोदय भाषण करताना म्हणाले, 'समाजवाद्यांची-कम्युनिस्टांची स्फूर्ती मार्क्सपासून आहे. आम्ही गांधीजींपासून घेतो, हा फरक आहे.' तुमचे काय म्हणणे?