सत्याग्रह 6
सरकारने लक्षात घेतले पाहिजे की जसजशी वेळ येईल तसतसे धैर्याने पाऊल पुढे टाकून कारखाने राष्ट्राचे करणे आवश्यक ठरेल, आणि जे मालक परवडत नाही म्हणून खुशाल कारखाने बंद करतात अशांचे तर ताब्यात घेतलेच पाहिजेत. चाळिसगावची गिरणी सरकारला हाक मारीत आहे. चाळिसगावचे सत्याग्रही कामगार आजच्या युगधर्मानुसार वागा असे सरकारला नि मालकाला सांगत आहेत. हजारोंच्या जीवनाचा खेळखंडोबा नाही होता कामा. ही गंमतीची गोष्ट नाही. जीवन-मरणाचा हा सवाल आहे. सरकारने नि मालकाने दोन महिनेपर्यंत उपाशीपोटी असूनही शांत राहिलेल्या व अखेर शांतपणे सत्याग्रहाचा मार्ग अवलंबिणार्या कामगारांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. कामगारांना यश येवो. त्यांची हाक ऐकली जावो. खर्या सत्याग्रहींचा त्यांच्या सत्याग्रहास पाठिंबाच मिळेल.
समाजवादी पक्षाच्या नेतृत्वाखाली पूर्व पंजाबात हिस्सार जिल्ह्यात तसेच तिकडे बिहारमध्ये काही ठिकाणी शेतकर्यांनी सत्याग्रह केला. हिस्सार जिल्ह्यात यश आले. आज लोकशाही सरकार आहे. लोकशाही मानणारे सत्याग्रह कसे करू शकतात असा सवाल काही बडेबडेही करीत असतात. श्री. गोविंद वल्लभ पंतांनी हाच मुद्दा म्हणे युक्तप्रान्तात मांडला. आपल्याकडेही कोणी असला अपवित्र पवित्रा घेत असतात. दैनंदिन जे अन्याय होत असतात तिकडे जर सरकारची उपेक्षा होत असेल तर अन्याय दूर करायला मार्ग कोणता? पुढील निवडणुकीपर्यंत का हरिहरी म्हणत बसायचे? केवळ निवडणूक म्हणजे लोकशाही असेच मानणार्यांच्या अकलेची कीव येते. एकदा निवडणूक संपकी की सर्वांनी का चूप बसायचे? गांधीजींनी जर सर्वात मोठी गोष्ट शिकवली असेल तर ती ही की, लोकशाही राज्य असूनही जर तेथे अन्याय होत असेल तर तेथे सत्याग्रह करणे कर्तव्य ठरते, त्यासाठी सरकार शिक्षा करील तर ती भोगावी. मला वाटते, 'Square of Swarajya- स्वराज्याचा चौकोन' या सुप्रसिध्द लेखात गांधीजींनी ही गोष्ट मांडली होती. सत्याग्रह आणि संप या गोष्टी शांततेने चालविण्यात आल्या तर त्या सनदशीर आहेत असे महात्माजींचे म्हणणे होते. अर्थात सर्व उपाय थकल्यावरच हे मार्ग अनुसरायचे, परंतु त्यांना स्थान आहे; आणि ज्या गोष्टी सनदशीर आहेत त्या लोकशाहीशी का विसंगत? महात्माजींची लोकशाहीची कल्पना विशाल होती. नेभळट आणि बावळट नव्हती. लोकशाही मानून पुन्हा सत्याग्रह करता, संपाचीही भाषा बोलता, असे म्हणणार्यांना महात्माजीप्रणीत लोकशाहीचा आत्माच कळला नाही. जयप्रकाश एकदा म्हणाले होते की, 'अशा सत्याग्रहाने लोकशाही अधिक संपन्न होते.' चाळिसगावच्या कामगारांनी शांततेने आपला लढा चालवावा. मुंबई सरकारने या बाबतीत ताबडतोब काही तरी केले पाहिजे. अशा प्रसंगी कारखाने ताब्यात घेऊन चालविले पाहिजेत. व्यक्तीच्या मालकी हक्काची सबब येथे पुढे आणून चालणार नाही.
श्रमणार्यांची मान उंच करावयाची असते. गादीवर लोळणार्या पूंजीपती शेणगोळयांची नसते करायची.
काँग्रेस मंत्र्यांच्या पहिल्या राजवटीतही चाळिसगावच्या कामगारांचा संप झाला होता. एक मंत्री म्हणे मालकावर दडपण आणून गिरणी उघडावी या मताचे होते. तर दुसरे मुनशी की खुनशी कोण होते ते म्हणतात, आणखी थोडे दिवस जाऊ देत. यांची जिरू दे चांगली. तुम्हांला कामगारांची जिरवावयाची आहे की देशाचे वाटोळे करायला निघालेल्या भांडवलदारांची जिरवावयाची आहे? तुम्ही नियंत्रणे उठविता, बसविता, उठविता; हा काय खेळखंडोबा चालविली आहे? मागे साखरेवरचे नियंत्रण उठवले तर मालकांनी किती महाग किंमती ठरवून घेतल्या. नियंत्रणे उठवली, तरी त्यांचा नफा चालूच. किंमती खाली येतच नाहीत. मालही रद्दी, भिकार, परदेशातीलपत गेली. चहामध्ये लाकडाचा भुस्सा मिसळतात. कापड रद्दी कापसाचे, अन्नधान्यात माती नि रेती मिसळतात. अशा पशुसम भांडवलदारांना बडगा दाखविण्याऐवजी बिचार्या निरुपाय म्हणून सत्याग्रह करणार्या कामगारांच्या मुसक्या बांधण्यात येत आहेत. दुदैंव देशाचे! महात्माजींच्या नावावर विकणार्या या काँग्रेस सरकारच्या राज्यात जगणे म्हणजे वेदना आहे.
कामगारांनो तुम्हाला चालवेल तोवर सत्याग्रह चालवा. शांततेने चालवा. आत्मक्लेश हाच आपला मार्ग. गांधीजींनी मरायला शिकविले आहे. मारायला नाही. न्याय यावा, समता यावी, श्रमजीवींची हेटाळणी टळावी, म्हणून सत्याग्रहाचा,
शांत-आत्मबलिदानाचा आपला मार्ग आहे!