राष्ट्रीय चारित्र्य 1
साहित्य आणि संस्कृती ही राष्ट्रीय चारित्र्य घडविण्याची प्रभावी साधने आहेत. राष्ट्रीय चारित्र्याच्या अभावी देशाची प्रगती अशक्य आहे. राष्ट्र चारित्र्यसंपन्न का नाही? कोणत्या मार्गाने आज लोकजीवन भ्रष्ट करण्यात येत आहे, त्याची विदारक मीमांसा.....
भगिनी निवेदिता यांनी एके ठिकाणी म्हटले आहे की, ''परिस्थिती कोणतीही असो, राष्ट्रीय चारित्र्य सतत प्रकट होत राहिले पाहिजे. जे राष्ट्र कोणत्याही परिस्थितीत नैतिक उदारता सोडीत नाही ते धन्य होय. जय की पराजय, स्वातंत्र्य की पारतंत्र्य हाही मुख्य सवाल नाही. सवाल हा आहे की राष्ट्राचे हृदय शुध्द आहे की नाही?'' हरिभाऊ उपाध्याय हे एक नामवंत हिंदी साहित्यिक आहेत. त्यांनी एके ठिकाणी पुढील अर्थाचे लिहिल्याचे स्मरते. ''पारतंत्र्यातही लोकमान्य टिळक, देशबंधू, महात्माजी, रवीन्द्रनाथ, अरविंद, प्रफुल्लचंद अशी पृथ्वीमोलाची नवरत्ने आम्हांला लाभली. त्या पारतंत्र्यासही प्रणाम करावा असे वाटते.''
आम्ही परतंत्र होतो ही गोष्ट खरी, परंतु हिंदुस्थानभर एक महान लाट गेली शंभर वर्षे होती. किती तरी मोठी माणसे दिसतात. त्याग दिसतो. सर्वसाधारण नीतीची उंचीही अधिक दिसते. परंतु आज भारतात सार्वजनिक चारित्र्य शिथिल झाल्याप्रमाणे वाटत आहे. ४२चा मोठा लढा झाला. नेताजींनी अमर असा स्वातंत्र्य संग्राम केला, खलाशांनी स्वातंत्र्याचे बंड पुकारले. अखेर स्वराज्य आले. विभागणीच्या रूपाने आणि नंतरच्या कत्तलीच्या स्वराज्याची किंमत द्यावी लागली. द्वेषमत्सराचे वणवे भडकले. गोकुळातील आग गोपाळकृष्णाने गिळली. महात्माजी राष्ट्रातील वणवे गिळावयास उभे राहिले. त्यांचीही अखेर आहुती पडली. स्वातंत्र्याच्या सूर्योदयाबरोबर द्वेषमत्सराचा सैतान हैदोस घालू लागला. महात्माजी गेले, परंतु एक प्रकारे शांती निर्मून गेले. असे वाटले, दिल्लीच्या अखेरच्या प्रवचनातून तो राष्ट्रपिता सर्वांना राष्ट्रीय सदगुणांचा संदेश देत होता. परंतु आपण त्यांचा संदेश कितपत ऐकत आहोत प्रभू जाणे! आज आम्ही असत्याचे जणू उपासक झालो आहोत. अशाने हे राष्ट्र कसे टिकेल? पश्चिमात्य राष्ट्रांत सार्वजनिक सदगुण म्हणून काही वस्तू आहे. राष्ट्रे वाढतात, समृध्द होतात, ती काही तरी चारित्र्य असते म्हणूनच. कचर्यातून अंकुर कधी वर येत नसतो. कचर्या बरोबर दाणा असेल तर तो दाणा अंकुरतो. राष्ट्राच्या जीवनात काही सत्त्वच नसेल, सारा कचराच असेल तर नवीन अंकुर तरी कशाचा येणार? गांधीजी कधीपासून सांगत होते की, सदगुण संवर्धन म्हणजे स्वराज्य. सदगुण जर राष्ट्रात नसतील तर स्वराज्य यायचे कसे? आले तरी फलद्रूप व्हायचे कसे?
मुंबईस मॅट्रिकची परिक्षा झाली, तिचा प्रकार जगजाहरी आहे. बोर्डाने म्हणे ती परीक्षा घेतली व बहुतेक सार्या प्रश्नपत्रिका फुटल्या. जिल्ह्यांत हा प्रकार. वेळेवर पुरेशा प्रश्नपत्रिका निघाल्या नाहीत. कधी सायंकाळी मिळाल्या, कधी मिळाल्या नाहीत, इत्यादी गोष्टी बाजूला ठेवू. बोर्डाला अनुभव नाही; पुढील वर्षी सुधारणा होईल असे समजू. परंतु प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांस कळतात कशा? प्रश्न सांगितले गेले हे खरे असेल तर किती वाईट. परीक्षा म्हणजे एक गंभीर वस्तू आहे. तेथे काही प्रामाणिकपणा हवा. ही एक सार्वजनिक बाब आहे. राष्ट्रीय चारित्र्याचा हा प्रश्न आहे. जर आपण असे करू लागलो तर त्यांनी का राष्ट्राचा मोठेपणा वाढतो? महाराष्ट्रांतील विद्वान मंडळींनी याचा विचार करावा. प्रश्नपत्रिका काढणारे, त्यावर देखरेख करणारे, यांना विद्वान नाही समजायचे तर कोणाला? परंतु राष्ट्राची तरुण पिढी बनवण्याचे ज्यांचे पवित्र कार्य, तेच जर सत्य, प्रामाणिकपणा, सार्वजनिक जबाबदारी यांना तिलांजली देतील तर या राष्ट्राला आशा कसली? महाराष्ट्राचे नाव अनेक रीतीने बदनाम होत आहे. ते आणखी बदनाम नका करू म्हणावे. सत्याला तिलांजली देऊन राष्ट्र मोठे होत नसते, आणि असल्याने क्षणभर मोठे दिसले तरी ते मातीला मिळाल्याशिवाय राहणार नाही.