निसर्ग 9
महात्माजी येरवडयाच्या तुरुंगात असतांना आकाशातील देवाचे हे, काव्य अभ्यासू लागले, चाखू लागले. आकाशातील तार्यांचे महान् उपासक श्री. काकासाहेब कालेलकर तेथे होते. महात्माजी तुरुंगातून आश्रमातील मुलांना तार्यांसंबंधी पत्रे लिहू लागले. महापुरुषांना नेहमी नवीन नवीन शिकावेसे वाटते. त्यांना जीवनाचा कोठेही कंटाळा येत नाही. आपण आकाशाकडे कधी पहातही नाही. प्रभात काळी अद्याप झुंजमुंजु आहे. ती कशी मौज असते त्याचा आपणास अनुभव नाही. आकाशात आता थोडे ठळक ठळक तारे दिसत असतात. महाकवी मुक्तेश्र्वांनी म्हटले आहे तो अरुण हंस येत आहे. त्याने आकाशातील तारारूपी मौक्तिकांचा फराळ चालविला आहे. आता. थोडेसेच मोती शिल्लक आहेत तेही तो खाईल.
हळूहळू तारे जातात. पूर्वेकडे रंग पसरतात, किती प्रसन्न शोभा, परंतु आपण कधी पाहातो का? रात्री आकाशात तार्यांची अमर व मनोरम मौज दिसते. परंतु कोण बघतो!
दिवसा थकलेल्या जनतेच्या डोळयांना आनंद देण्यासाठी देव वर फुलबाग फुलवितो. परंतु आपण डोळयांना दिपविणार्या झगझगीत बोलपटांनाच जाऊ. बोलपट पाहू, पण ईश्वराचा हा मुका चित्रपट पहा.