सत्याग्रह 3
उत्पादन वाढल्याशिवाय देशाचा प्रश्न सुटणार नाही. शेतीचे उत्पादन व कारखानदारी उत्पादन. दोन्ही वाढली तरच देशाचा तरणोपाय आहे. राष्ट्र दिवाळखोर होत आहे. शंभर कोटींहून अधिक रुपये दरसाल कोठवर देत राहणार? देशातील अन्नधान्य कधी अधिक होणार? कापसासाठीही पंचवीस-तीस कोटी रुपये मागील वर्षी पाठवावे लागले. वस्त्रासाठी प्रसिध्द असा हा प्यारा भारत देश आज पुरेसा कापूसही पिकविनासा झाला. कापूस नाही म्हणून गिरण्या बंद होऊ लागल्या. एकीकडे अधिक उत्पादनाची हाक तर इकडे गिरण्याच बंद आहेत. हे सारे गाडे कसे सुधारणार? मालक, भांडवलदार अधिक उत्पादन करायला नाखूष आहेत. भांडवलदार नफेबाजीसाठी चणचणच ठेवू इच्छित असतात. अशांच्या बाबतीत सरकार कठोर होऊ इच्छित नाही. कामगारांची योग्य मजुरी ठरवावी, याला मालकांनी विरोध केला. श्री. अशोक मेहता म्हणतात, ''त्या बाबतीत काढा ना वटहुकूम. ठरवून टाका योग्य वेतन.'' परंतु येथे वटहुकूम काढायची हिंमत नाही. मालकांसमोर नरमाई आणि श्रमणार्या कामगारांबाबत वटहुकूमी वृत्ती, याची आम्हांला चीड येते. हिंदुस्थान सरकारने आजूबाजूच्या घडामोडी लक्षात. घ्याव्या. चीनमध्ये एका लष्करी उत्पादनाच्या कारखान्यात ट्रॅक्टर सुरू झाले. आमच्याकडे नाही होत अजून आगगाडीचा डबा तयार, नाही होत ट्रॅक्टर. आमच्या कागदी योजना, -वीस वर्षांनी होणार्या प्रचंड धरणाच्या. आज या घटकेला अन्न आणि इतर आवश्यक वस्तू यांचे उत्पादन झपाटयाने वाढेल अशी प्रेरणा नाही, स्फूर्ती नाही. थातुरमातुर काम. इंग्लंडमधील हेंडरसन हिंदुस्थानात हिंडून गेले. श्री. दादासाहेब मावळंकर रत्नागिरी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या सभेत म्हणाले, ''मी विलायतला गेलो तेव्हा हेंडरसन साहेबांस विचारले, हिंदुस्थानबद्दल काय वाटले?''
हेंडरसनना बोलतांना शेवटी आग्रहच केला तेव्हा ते म्हणाले, 'There is no one in earnest there तेथे कोणाला तळमळ लागली आहे असे दिसले नाही.' ते शब्द ऐकून मी मान खाली घातली!' हिन्दुस्थानात एकच तळमळ आहे. सरकारला हाती सत्ता ठेवण्याची तळमळ. व्यापारी, कारखानदार यांना नफेबाजीची आणि देशाचे नाव दुनियेभर बददू करण्याची तळमळ. सामान्य जनता स्वराज्य आले तरी ते अनुभवास येत नाही म्हणून दुःखी, कष्टी. असे हे आज दृश्य आहे. सरदार कलकत्त्याच्या मतदारांना म्हणतात, 'आम्ही होतो म्हणून इतके केले; राष्ट्र वाचवले.' कोठवर टिर्या बडवणार! राष्ट्राला आर्थिक संकटातून वाचवायचे आहे. तेथे खंबीर हात हवे आहेत, - जे भांडवलशाहीच्या उच्चाटनास सज्ज होतील, परंतु ते वज्रा-हस्त भांडवलदारांस गोंजारीत आहेत, आणि कामगारांच्या बोनसवर येऊन पडत आहेत. नाना मंत्र्यावर लांचलुचपतीचे आरोप केले जात आहेत.
वकिलातींच्या उधळपट्टीवर टीका होत आहेत. नैतिक तेज नष्ट होत आहे. त्याग, ध्येयवाद आम्ही विसरत चाललो. हा देश दरिद्रीनारायणाचा, ही गोष्ट विसरत चाललो. आप्तेष्टांना नोकर्या -चाकर्या देऊ लागलो. महात्माजींनी १९३७ साली मंत्रिमंडळे घेतली तेव्हा लिहिले होते, 'Caesar’s wife must be above suspicion'