सर्वोद्य व अनाग्रही निष्ठा 2
सर्वोदयाचे शाब्दिक बुडबुडे आम्हाला नकोत. कारखानदार कोटयवधी रुपये नफा उकळीत आहेत. विश्वासात नालायक असल्याचे स्वतःच्या देशद्रोही वर्तनाने सिध्द केले आहे. केलेत का त्यांना पदभ्रष्ट? श्रीमंतांची श्रीमंती गरीबांसाठी आणाल तेव्हाच उभयतांचा उद्धार नि उदय होईल. प्रश्नाच्या मुळाशी हात घाला. मलमपट्टी करून सर्वोदय येणार नाही. समाजवादी पक्ष बाहू उभारून हे सांगत आहे. जनतेला गरीबांची मान उंच करणारी समाजव्यवस्था नि अर्थव्यवस्था हवी असेल तर ती समाजवादी पक्षाच्या पाठीमागे जात-पात, नाते-गोते, धर्म-बिर्म, प्रांत-भाषा, इत्यादी सारे बाजूला ठेवून उभी राहील. जनता मत देईल. आर्थिक मदतही देईल. समाजवादी पक्ष घुबडाच्या धूत्कारांस न भिता, सरकारी दरडावणीस न भिता, पूंजीपतींच्या पत्रांची भुकणी न जुमानता सेवेने, संघटना करीत, नवश्रध्दा, नवस्फूर्ति सर्वत्र पेटवीत एक अभिनव भारत निर्मायला उभा आहे. तरुण भारतास तो हाक मारत आहे. ती हाक तरुण हृदयास नि तरुण बुध्दीस उचंबळल्याशिवाय कशी राहील?
समाजवादी पक्ष देशभर प्रचार करून लोकशाही मार्गाने कायदेशीर समाजवाद आणण्यास धडपडत आहे. महात्माजी दिल्लीला म्हणाले, ''स्वतंत्र हिंन्दुस्थान एक दिवसही आर्थिक विषमता सहन करणार नाही.'' ते जळजळीत उद्गार कोण विसरले? आता हिंद मजदूर, हिंद किसान पंचायत अशा अखिल भारतीय संघटना निर्माण केल्या आहेत. कोटीकोटींनी त्यांचे सभासद व्हा. खरा समाजवाद आणून खरा सर्वोदय शक्य करा.
(१५ जानेवारी १९४९)
प्रश्न : तुम्ही सर्वोदय समाजात का जात नाही?
उत्तर : मी कोणत्याच पक्षाचा वा संस्थेचा सभासद नाही. मी मोकळा आहे. ज्याचे विचार मला पटतात त्यांची बाजू मी मांडतो. सर्वोदय समाज मला आकर्षू शकत नाही. प्राचीन काळापासून 'सर्वेऽपि सुखिनः सन्तु' असे आम्ही घोकीत आलो, परंतु काही मूठभर लोक सुखात असावेत आणि बाकीची जनता राबत असावी असे द्दश्य दिसते. सर्वोदय समाज जोपर्यंत जमिनदारी रद्द करीत नाही, मोठे कारखाने राष्ट्राच्या मालकीचे करा असा आग्रह धरत नाहीत तोवर सर्वोदयाचे ध्येय स्वप्नच राहणार आहे. मला श्रमणार्या चा उदय हवा आहे.
प्रश्न : आज जमिनदारी दूर करावयाची असेल तर कोटयवधी रुपये मोबदला म्हणून द्यावे लागतील. चलनवाढ आणखीनच होईल. सरकारने कोठून आणावयाचे पैसे?
उत्तर : मोबदल्याची मर्यादा घातली पाहिजे. बिहार सरकार जमिनदारी रद्द करण्याचे बिल आणणार होते. काही नुकसान भरपाई देणार होते, परंतु दिल्लीच्या बडया नेत्यांनी त्याला विरोध केला. असे ऐकतो. ते म्हणाले, दरभंग्याचे महाराजांची हजारो एकर जमीन. त्यांना का दोन चार लाखच नुकसान भरपाई म्हणून देणार? हा अन्याय आहे. घटना समितीने योग्य मोबदला द्यायला पाहिजे असे म्हटले आहे. योग्य याचा अर्थ काय? १९३१ मध्ये गोलमेज परिषदेला महात्माजी गेले होते. एकदा प्रश्नोत्तराच्या वेळी ते म्हणाले, 'ज्यांचे शंभर रुपयाचे उत्पन्न जात असेल त्याला मी ५० रुपये नुकसान भरपाई किंवा मोबदला देईन, परंतु ज्याचे एक कोटीचे नुकसान होत असेल त्याला शेकडा १ टक्का नुकसान भरपाई देईन. आचार्य नरेन्द्र देवांनी पाटण्याच्या अध्यक्षीय भाषणात हीच मर्यादा सांगितली. त्याहून अधिक मोबदला देऊ नका. दरभंग्याच्या महाराजांस द्या एक लक्ष रुपये. करा जमीनदारी नष्ट; परंतु कोणा सांगावयाचे, कोणी करावयाचे!