संयुक्त महाराष्ट्र, आंतरभारती व एकात्म भारत 5
कोणी म्हणतात, मुंबईचा प्रश्न दहा वर्षे बाजूला ठेवा. का रे बाबा? दहा वर्षांची एखादी योजना असेल बहुधा. धनिक लोक भराभर सर्वत्र जागा घेऊन नव्या नव्या वस्त्या मुंबईच्या उपसरात करीत आहेत. सिंधीबंधू, गुर्जरबंधू, सर्वत्र पसारा वाढवीत आहेत. दहा वर्षांनी म्हणाल, आता तर तेथे महाराष्ट्रीय अल्पसंख्यच आहेत! आजच कोणी असे म्हणत आहेत. कोणी महाराष्ट्रीय म्हणतो की, त्या बिचार्या सिंधीबंधूंच्या बोटी जवळच्या उखा बंदरात उतरविता आल्या असत्या; अहमदाबादमध्ये त्यांची वरती करता आली असती. मुंबईतच लाखो आणून का ठेवलेत? ह्याच्या मागे भूतदयाच होती की मुंबईचा रंग पालटायचा होता? जेव्हा तुम्ही आणखी दहा वर्षे बोलू लागता तेव्हा अशा शंका डोलावू लागतात. म्हणून समाजवादी पक्षाने, मुंबई म्युनिसिपालिटीत प्रश्न दहा वर्षे दूर ठेवायचा असला तरी दहा वर्षानंतरही मुंबई महाराष्ट्रातच राहील असे निश्चित ठरवा असे म्हटले, परंतु काँग्रेसी नगरपिते त्याचा विचारही करावयास तयार झाले नाहीत. मुंबईची काँग्रेस म्हणजे श्रीमंतांची काँग्रेस आहे. तिचे मत ते का मुंबईचे मत?
भाषावार प्रांतरचना करा असे म्हणताना जुने इतिहास दाखवणे अप्रस्तुत आहे. जुने इतिहास शौर्यधैर्याने भरलेले असले तरी त्यांच्या जोरावर इतर भारतीयांना नावे ठेवत असाल तर त्याला अर्थ काय? प्रत्येक प्रान्ताने कोठल्या ना कोठल्या काळात भव्य-दिव्य निर्माण केलेच आहे. कोणी कोणाला हिणवू नये. आपणास एकदिलाचा नवभारत निर्माण करावयाचा आहे. तो अशा तेढी वाढवून निर्माण होणार नाही.
शिवाजीपार्कवर एक वजनदार वक्ते म्हणाले, 'संयुक्त महारष्ट्रास हिंदी संघराज्यातून फुटण्याचाही अधिकार हवा.' आणि ह्या जबाबदार नेत्याने पुढे असे सांगितले, 'आता नवरा-बायकोच्या काडीमोडीचाही कायदा झाला आहे!' त्यांना टाळया मिळाल्या, जणू राष्ट्राचे प्रश्न म्हणजे नवरा-बायकोचा चिमकुला संसार! बाबांनो, गंभीर प्रश्नांचा असा खेळ नका करू. तुमचा होईल खेळ राष्ट्राचा जाईल जीव. रशियन घटनेतही असा फुटून जायचा अधिकार आहे म्हणूनही कोणी बोलतात. तेव्हा या फुटून निघण्याच्या बोलण्याच्या पाठीमागे कम्युनिस्ट बौध्दिक आहे असे दिसते.
हिंदुस्थान एक राष्ट्र आहे असे आपण म्हणत आलो. मरहूम जिनांचा द्विराष्ट्रवाद आपण मान्य केला नव्हता. या देशातील मुसलमानांचीही केवळ भिन्न संस्कृती नाही. आम्ही एक संस्कृती निर्मीत होतो. मुसलमान मूळचे येथलेच. जिनांनी ही गोष्ट मानली नाही. इंग्लंडमधीलही मोठमोठे हिंदुस्थान एक राष्ट्र नसून खंडप्राय देश आहे असे म्हणत. जिनांनी तर चुकूनही Subcontinent खंडप्राय देश याशिवाय उल्लेख केला नाही. अपरिहार्य म्हणून, द्विराष्ट्र सिध्दान्त मान्य म्हणून नव्हे, पाकिस्तानलाही राष्ट्रनेते तयार झाले. आता महाराष्ट्रीय हे का निराळे राष्ट्र आहे? तिकडे द्रविडी लोकही निराळेपणाची भाषा बोलू लागले आहेत. म्हणजे जिनांचे म्हणणे एकंदरीत खरे का? हिंदुस्थानात अनेक राष्ट्रे आहेत, हे जे त्यांचे म्हणणे त्यालाच तुम्ही उचलून धरीत आहात का? म्हणजे अप्रत्यक्षपणे जिनांचेच अनुयायी सारे होत आहेत.