संयुक्त महाराष्ट्र, आंतरभारती व एकात्म भारत 16
म्हणून आपण क्षुद्र कुंपणे घालून बसता कामा नये. व्याप वाढवाल तर वैभव वाढेल. संकुचितता सोडा. सारे प्रांत एकमेकांजवळ प्रेमस्नेहाने वागोत. भारताचे एक हृदय असो. प्रांत एकजीवी असोत. प्रांतभारती आणि विश्वभारती अशी आमची दोन ध्येय आहेत. ते थोर पूर्वज म्हणाले,
'कृण्ववन्तो विश्वमार्यम्'
आपण सर्व विश्वाला आर्य म्हणजे उदरा, सुसंस्कृत करू. म्हणून चिनी भाषा शिकून त्या भाषेत प्राचीन पंडितांनी ग्रंथ लिहिले. विनोबाजी अरबी शिकून कुराणाचा महिमा मुसलमानांना आज सांगत आहेत.
प्रांतांचा परस्परांशी आणि भारताशी प्राणमय संबंध - याला आपण प्रांतभारती ध्येय म्हणू.
दुसरे, रवींद्रनाथांनी उदघोषिलेले विश्वभारतीचे. भारताचा सर्व जगाशी संबंध ठेवणे. असे हे संबंध संयम नि सहानुभूती विशाल व थोर दृष्टी, ही असतील तरच निर्माण होतील. प्रांतांचे भारत हृदय नि भारत विश्वाचे हृदय होईल.