जातिधर्मनिरपेक्ष राष्ट्र व सामाजिक समता 2
जाति-धर्मनिरपेक्ष घटनेला मान्यता देणार्या सर्व लहानथोरांनी आपआपल्या प्रान्तात तसा नवराष्ट्र निर्मितीचा प्रचार केला पाहिजे. हिंदु, मुस्लिम, जैन, शीख, ख्रिश्चन, पारशी, ज्यू सर्वांनी आन्तरिक ऐक्याच्या महान प्रयोगासाठी उभे राहिले पाहिजे- असे आपण जरी नकळत तोंडाने जातिधर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हटले तरी भारतात आपआपल्या जातिधर्माच्या डबक्यात बसणार्यांची येथे अनेक राष्ट्रे आहेत असाच अर्थ होईल. दुनिया असेच म्हणेल.
स्वराज्यात ज्याप्रमाणे शेतकरी कामकरी सुखी व्हावेत असे आपण म्हणतो त्याचप्रमाणे अस्पृश्यही सुखी व्हायला पाहिजेत. त्यांना इतरांप्रमाणे जमीन मिळेल, कारखान्यांत स्वाभिमानपूर्वक काम करता येईल. परंतु त्यांना शेतीवाडी मिळाली, काम मिळाले एवढयाने सारे होईल असे नाही. अस्पृश्य बंधू विचारतात, ''स्वराज्यात आमची स्थिती कशी राहील ते सांगा.'' तुम्ही त्यांना काय सांगणार? १९४२ साली चले जावचा लढा ज्या वेळेस सुरू झाला होता, त्या वेळेस मुंबईस डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे एक भाषण झाले होते. त्या भाषणात ते म्हणाले होते, ''काँग्रेसचे पुढारी ब्रिटिशांना युध्दहेतू विचारत असतात. मीही चले जावच्या काँग्रेसी लढाईचे युध्दहेतू विचारत आहे. जे स्वराज्य तुम्ही आणणार त्यात पाच सहा कोटी दलित जनता अशीच माणुसकीस पारखी राहणार ना? कोणते स्वराज्य तुम्ही आणू पाहाता?'' असे त्यांनी विचारले होते. ब्रिटिशांनी हिंदुस्थानला युध्दाच्या खाईत ओढले. काँग्रेसने सांगितले, ''हे युध्द लोकशाहीसाठी असेल तर या देशाला लोकशाही का देत नाही? युध्द स्वातंत्र्यासाठी आहे तर मग आम्हांला स्वातंत्र्य का देत नाही?'' डॉ. बाबासाहेब आंबेडकर काँग्रेसला तोच प्रश्न विचारतात.
संपूर्ण सत्ता हाती आल्यानंतर सर्वांना जमीन वाटून देऊ. तेव्हा देऊ. परंतु जे स्वराज्य आपण कोटयवधी बंधूंना देऊ शकतो, ते आपण का देत नाही? स्वातंत्र्य दोन प्रकारचे आहे. एक आर्थिक नि दुसरे सामाजिक. सामाजिक स्वातंत्र्य या घटकेला आपण सर्वांना देऊ शकतो. त्याच्या आड कोणी येत नाहीत. तुमच्या विहिरीवर हरिजनाने पाणी भरले तर का कोणी आड येणार आहे? हे सामाजिक स्वातंत्र्य आपणच अडवून ठेवले आहे. मनाचा मोठेपणा असेल तर एका क्षणात ते आजही दिले असते.
गेल्या शतकात ही अस्पृश्यता जावी म्हणून अनेकांनी प्रयत्न केले. महात्मा ज्योतिबा फुले यांनी प्रथम पुण्याला आपल्या हौदावर हरिजनांना पाणी भरू दिले. त्यांनी त्यासाठी शाळा काढल्या. त्यांनी निंदा, अपमान, बहिष्कार सारे सहन केले.
''तरिच संत व्हावे
जग बोलणे सोसावे''