समाजवाद 8
मी समाजवादी पक्षाचा सभासद नाही, परंतु माझी सहानुभूती त्या पक्षाला आहे. काँग्रेसमध्ये राहणे नव्या घटनेमुळे समाजवादी पक्षास अशक्य झाले, तो अलग झाला. महात्माजी काँग्रेसमध्ये समाजवादी असावेत असे इच्छित. नरेन्द्र देवांना अध्यक्ष करा, ते म्हणाले. परंतु त्यांचे तरी ऐकतो कोण? ते तर या राष्ट्रात समंजसपणा यावा म्हणून गेले. ज्या स्वराज्यासाठी धडपडत होते ते अजून यायचे आहे.
नियंत्रणे उठवा, किंमती उतरतील. भांडवलदार महात्माजींना म्हणाले. नियंत्रणे उठली. किंमती उतरण्याऐवजी वाढल्या. आपल्या देशातील भांडवलदार, व्यापारी यांना पैशापलिकडे काही नाही. परंतु सरकार त्यांच्या बाबतीत दयाशील. आम्ही दहा-वीस वर्षे भांडवलदारांस हात लावू इच्छित नाही ते म्हणतात. हिंदुस्थानच्या भोवती लाल ज्वाळा आहेत. लौकर समाजवादाकडे पावले टाकल्याशिवाय सोय नाही.
समाजवादी राजवट आली तरी एकदम स्वर्ग नाही येणार. परंतु संस्थानिक, भांडवलदार सर्वाची अधिक संपत्ती राष्ट्राची करण्यात येईल. अशी आर्थिक समता आणून कामगारांना मंत्र सांगू, की अजून काटकसरीनेच राहू. जे अधिक उत्पादन होईल ते अधिक उद्योगधंद्यासाठी वापरू. अशा रितीने पुढे जाऊ. समाजवादी वातावरण निर्माण होईल.
तुम्हांलासुध्दा जर एकदम स्वर्ग नसेल निर्माण करता येत तर काँग्रेसला का नावे ठेवता असे कोणी विचारतात. त्यांना उत्तर हे की, काँग्रेस त्या दिशेने पावलेही टाकीत नाही. समाजवादी पक्ष आता सांगितल्याप्रमाणे महिना ५०० रुपयांहून अधिक उत्पन्न असता कामा नये असे ठरवून त्या दिशेने वेगाने नियोजनपूर्वक जाईल.
परंतु ही जीवननिष्ठा देणे हे का पाप? हवा, पाणी, प्रकाश ही सर्वांना हवीत. त्यांच्यावर व्यक्तीची मालकी नसावी. त्याप्रमाणे मोठमोठे कारखाने राष्ट्राच्या मालकीचे करावेत असे म्हटले तर का पाप आहे? जमिनी सामुदायिक सहकारी पध्दतीने कसाव्यात, म्हटले तर का पाप?
राजकारण म्हणजे पाप नव्हे. महात्माजी म्हणत, राजकारणही आपण आध्यात्मिक करू. नामदार गोखलेही म्हणत की, निर्मळ भूमिकेवरून राजकरण करू आणि नुसती लोकसेवा करून का सारा समाज सुखी होणार आहे? श्रीमंतांच्या जवळून देणग्या घेऊन, समाजाच्या दुःखावर मलमपट्टी करीत बसल्याने रोग हटणार नाही. कीव करणे याहून वाईट गोष्ट ती कोणती?
जो रात्रंदिवस श्रमतो, त्याची कीव करून त्याला कपडे नका वाटू; त्याचा हक्क नाही का? जो काम करायला तयार आहे त्याला काम द्या, स्वाभिमानी भाकर त्याला खाऊ दे. हे सारे करावयाचे म्हणजे समाजवादी दृष्टीच हवी. ती देणार्या पक्षांविषयी निष्ठा असली म्हणून काय बिघडले?