समाजवाद 2
कोणी तुम्हाला संस्कृतीच्या नावाने भुलवू पाहतील. हिटलर संस्कृती संस्कृतीच म्हणत असे. आपण इतरांहून श्रेष्ठ हा त्यात अहंकार असतो. खरी संस्कृती सर्वांच्या जीवनाचे मूलभूत प्रश्न सोडवण्यात आहे. एखाद्या धर्माच्या नावे संघटना करून प्रश्न सुटत नसतात. म्हणून तुम्ही धर्म, संस्कृती या पोकळ शब्दांनी विचलित होऊ नका.
काँग्रेस पूंजीपतींची झाली आहे. कम्युनिस्ट आततायी मार्गाने जात आहेत व सरकारला नागरिक स्वातंत्र रोखायला कारणे देत आहेत. कोणी संस्कृतीधर्म या नावाने विषे पसरीत आहेत. अशातून आपणास जावयाचे आहे. सरकार समाजवादी कार्यकर्त्यासही हद्दपार करते. आपण गांगरून जाता कामा नये. अत्याचारापासून दूर राहिले पाहिजे. काम करीत राहू. एक तुरुंगात गेला, दुसरा उभा करा. अशा रीतीने कार्यकर्ते पुरवू. अभ्यास करा, संघटना करा, निरहंकारी वृत्तीने काम करा. यशापयश पक्षाचे. आपण व्यक्ती कोण? ही भावना असू दे. म्हणजे काम वाढते, माणसे जोडता येतात. तुम्ही नवयुगास स्मरून पुढे चला. समाजवाद हा आमचा युगधर्म आहे. तुम्ही संकुचितता सोडून पुढे चला. जात, पात, धर्म न बघता गरीबांचे प्रश्न डोळयांसमोर ठेवा.
भारतात जमीनदारी नष्ट करण्याची थातुरमातुर बिले केली जात आहेत. अशाने कोटयवधी किसान कसे शांत होणार? गोविंद वल्लभपंत कोटयवधी रुपये जमीनदारांना मोबदला देण्यासाठी मागतात. निजामीतील जमिनदरांना मोबदला द्यायचा तर म्हणे १७ कोट रुपये लागतील. बिहार, ओरिसा, मध्यप्रदेश येथील बिलेही भिकार व तुटपुंजी. ठायीठायी लोखो शेतकरी लढत आहेत. ओरिसामध्ये काँग्रेसी लोकांच्या व सरकारच्या विरोधी प्रचाराला व धमक्यांना धूप न घालता लाखो शेतकरी पायी मोर्चे काढीत आले व प्रत्येक शेतकरी कुटुंबास १२॥ एकर जमीन द्या, शेतसारा प्राप्तीवरील कराप्रमाणे क्रमवार ठरवा, शेतीच्या मालाच्या किंमती कारखान्यातील वस्तूंच्या किंमतीहून कमी असता कामा नयेत, वगैरे मागण्या करते झाले. हैद्राबादकडे म्हणे कम्युनिस्टांचे बंड आहे. तेथील शेतकर्यांची दैना सरकारला माहीत आहे? जेथे घाण, दलदली, अंधार तेथे डासांचा बुळबुजाट न झाला तरच आश्चर्य! त्याप्रमाणे कोटयवधी श्रमजीवींची जर अन्याय्य लूट होत असेल तर कोठवर त्यांनी सहन करावयाचे? काश्मीरमध्ये जर प्रत्येक शेतकर्यांना ५ एकर जमीन देण्यात येते तर येथे का देता येऊ नये? सरकार कम्युनिझमला खाद्य पुरवीत आहे.
देशासमोर चलनवाढ नि महागाईचा गंभीर प्रश्न आहे. कामगारच उत्पादन कमी करतात हे खोटे आहे असे श्री. जगजीवनराम यांच्या भाषणावरूनच दिसते. या सर्व कारवाया मालकांच्या असतात. अधिक भांडवल गुंतवायचे नाही, उत्पादन वाढवायचे नाही, वॅगनी दिल्या तरी माल चढवायचा नाही असे करून सरकारला सतवायचे, छळायचे, अशी आज हिंदी भांडवलशाहीची दुष्ट देशद्रोही नीती आहे. सरकार भांडवलदारांना तेव्हाच खणखणीतपणे बजाविल जेव्हा कामगार एकजुटीने प्रंचड आवाज करतील. कामगारांची असंघटित शक्ती जोवर सरकारला दिसत आहे तोवर सरकार आपले मालकधार्जिणे धोरण कशाला सोडील? सरकार कामगारांची कसोटी पाहात आहे. कामगारांनी राष्ट्रव्यापक उत्तर दिले पाहिजे. चलनवाढ थांबवता येत नसेल, तर तुमच्याच पे-कमिशनच्या म्हणण्याप्रमाणे महागाईभत्ता द्या. असे कामगारांचे व त्यांच्या नेत्यांचे म्हणणे आहे. न महागाई भत्ता द्याल तर कसे जगायचे? देशासाठी सतत उपासमारीचा त्याग गरीबांनीच करायचा का? त्यांनीच अंधारचाळीत राह्यचे, उघडयावर पडायचे, उघडे राहायचे, उपाशी काम करायचे, दव्याशिवाय मरायचे-असे का ठरलेले आहे?