संतांचा मानवधर्म 5
सावधान!
पंढरपूर म्हणजे महाराष्ट्राचे हृदय. महाराष्ट्राच्या जीवनाची ही किल्ली. पंढरपूरची कळ दाबली तर महाराष्ट्रभर प्रकाश पडेल असे मनात आले. पंढरपूर म्हणजे दक्षिणची काशी. येथील पांडुरंगाचे मंदिर अति प्राचीन. जवळ जवळ अडीच हजार वर्षांचे. बडवे मंडळी तेथे येऊनच दोन हजार वर्षे झाली. बडवे मंडळी कर्नाटकातून आली. पंढरीचे वारकरी तिकडेही आहेत. कानात मकरकुंडले घालण्याची दक्षिणेकडचीच पध्दती. आद्य शंकराचार्य पांडुरंगाच्या दर्शनार्थ आले होते. त्यांनी पांडुरंगाष्टक स्तोत्र केले आहे. ''देवा, कमरेवर हात ठेवून माझ्या भक्तांना संसारसागर कमरेइतकाच खोल आहे. असे का तू दाखवीत आहेस?'' असे त्यांनी त्यांत म्हटले आहे. पंढरपूर, बार्शी म्हणजे प्राचीन धर्मसंस्कृतीचा वसौटा. धर्मसंस्कृतीचे माहेरघर. अंबरीष राजा बार्शीचाच. अंबरीषासाठी भगवान आला, पुंडलिकासाठी पंढरपूरचे परब्रह्म आले. असे हे प्राचीन पवित्र मंदीरच सर्व लेकरांना मोकळे व्हावे म्हणून मी उपवास सुरू केला होता.
वारकरी पंथ सुरू होण्यापूर्वी जवळजवळ हजार वर्षे हे मंदिर प्रसिध्द होते. पुढे संतांनी आणखी महिमा वाढवला. नामदेव-ज्ञानदेव उत्तरेची यात्रा करून आले. इस्लामी धर्म येत होता. मलबार किनार्यावर तो कवीपासून आलेला होता. इस्लामी धर्मातील समतेचा परिणाम संतांच्या मनावर झाल्याशिवाय राहिला नाही. हिंदुधर्म उदार न होईल तर टिकणार नाही असे त्यांना वाटले असावे. मशिदीत सारे समान. हिंदु मंदीरात असे केव्हा होईल? असे विचार त्यांच्या डोक्यात आले असतील, तेव्हा पंढरपूरच्या वाळवंटात तरी भेदभाव, शिवाशिव नको असे त्यांनी ठरविले असावे. सार्या महाराष्ट्रातून विठ्ठलनामाचा गजर करीत येथे या. या वाळवंटात एकत्त्व अनुभवा, येथे परस्परांस भेटा. क्षेमालिंगने द्या. आणि नवीन प्रथा सुरू झाली, वाळवंट दणाणले, गजबजले. तुकारामांच्या वाळवंटाचा अपार महिमा आहे.
''एकमेकां लोटांगणी येती रे
कठोर हृदये मृदु नवनीते
पाषाण पाझर फुटती रे,''
असे उचंबळून तुकोबा म्हणतात.
संत बंडखोर होते. संस्कृतीतील ज्ञान मराठीत आणले. संत कारुण्यसागर होते. झोपडी झोपडीत त्यांना ज्ञान न्यायचे होते. खरा धर्म न्यायचा होता. त्यांचा छळ झाला. ज्ञानेश्वरादिकांवर बहिष्कार. कुंभाराचे मडकेही त्यांना मिळू दिले नाही. तुकारामाचे अभंग इंद्रायणीत फेकण्यात आले. एकनाथी भागवत काशीच्या पंडितांनी गंगेत फेकले. संत मेल्यावर त्यांच्या पालख्या आपण उचलतो, परंतु ते जिवंत असताना त्यांचे आपण छळच केले, परंतु ते डगमगले नाहीत. वाळवंटात तरी त्यांनी भेदभाव नष्ट केला.
त्याच्या पुढचे पाऊल आपण नको का टाकायला? समाज पुढे जात असतो. नदी थबकली की संपली. समुद्राला मिळेपर्यंत ती पुढे जाणार. आपणही अवघाची संसार सुखाचा होईपर्यंत पुढे गेले पाहिजे, परंतु आपण पुढे गेलो नाही. पंढरपूरच्या वाळवंटात एकमेकांना भेटू, परंतु देवाजवळ हरिजनांना जाता येत नाही. वारी करून घरी आल्यावर गावात शिवाशिव आहे ती आहेच. शेवटी पंढरपूर स्वतःजवळ आणायचे असते. एकनाथ म्हणतात.