जातिधर्मनिरपेक्ष राष्ट्र व सामाजिक समता 10
परंतु खरी गोष्ट हीच आहे की, आम्ही कोठेही गेलो, कोठेही असलो तरी आमची जातीय दृष्टी घेऊन जाऊ. डॉ. बाबासाहेब आंबेडकर व श्री राजभोज यांच्या मते हिंदु धर्मीय बुध्दधर्मी झाले म्हणजे जातीयता जाईल. एक तर बुध्दांना दशावतारांत घालून त्यांची 'अहिंसा परमो धर्मः' वगैरे शिकवण घेऊन आम्ही बुध्द धर्म आत्मसात केलाच होता. परंतु हिंदु धर्माऐवजी बुध्दधर्म नाव घेतल्याने का क्रान्ती होणार आहे? ख्रिश्चन धर्मात गेलेल्यांत हा ब्राह्मण ख्रिश्चन, हा महार ख्रिश्चन असे भेद आम्ही ठेवलेच आहेत. बुध्द धर्म नाव घेतले तरीही खोड का जाणार आहे? परवा एका महार मित्राच्या घरी लग्नास चांभार बंधूला बोलाविले तर तेही तेथील अनेकांना आवडले नाही. ही तर आपली दशा आहे.
धर्माची नावे बदला, पक्षांची नावे बदला. जातीचे बिल्ले लावूनच आपण सर्वत्र असेच मिरवणार. जे आपल्याला मार्क्सवादी म्हणतात, अधिक क्रान्तिकारक समजतात, त्यांच्याजवळही आधी जातीला मान असतो हे पाहिले म्हणजे मनात येते. तो मार्क्स उद्विग्न होऊन म्हणेल, ''या मित्रांपासून वाचवा मला!'' कोठला मार्क्सवाद, कोठली जातिधर्मनिरपेक्ष द्दष्टी! एका प्राथमिक शिक्षकाचे मला पत्र आले, ''मी सोनार जातीचा आहे. म्हणून माझी सतरा ठिकाणी बदली. मी ब्राह्मणेतर असलो तरी पुन्हा सोनार पडलो, त्यामुळे ही दशा.'' आपण एका थोर ध्येयाचे उपासक आहोत, त्यासाठी लढणारे झिजणारे आहोत, आपण सारे एक, आपण जणूं एक आत्मा, एक भ्रातृमंडळ, अशी निष्ठा जोवर नाही तोवर कोणतेही नाव घ्या, कोणतीही बिरुदे मिरवा, सारे फोल आहे. तुमच्या मनातून जाती, धर्म, नावे, आडनावे हे सारे गळून तेथे उज्वल जळजळीत ध्येयनिष्ठा तळपू लागेल तेव्हाच पाऊल पुढे पडेल. नाही तर सेवा व्हायची दूर राहून हेवेदावे मात्र माजतील. ध्येयाकडे जायचे दूर राहून जातीयतेच्या डबक्यातच रुतून बसाल, आणि राष्ट्रालाही त्यात फसवाल. मनातील घाण जावो म्हणजे बाहेरची जाईल.