स्वातंत्र्य व स्वराज्य 6
काँग्रेसची मोठमोठे नेते म्हणत असतात, ''एक काँग्रेस तरी सत्ता चालवील, नाही तर कम्युनिस्ट. समाजवाद्यांना कोण विचारतो?'' श्री रामानंदतीर्थाचे हेच हैदराबादी उदगार. '''Either we rule or the Communists.' युत्त प्रान्तातील एक मंत्री असेच एका मित्राजवळ बोलले. श्री. एस. के. पाटील वर्षापूर्वी हेच म्हणाले होते. निर्मळ साधनांनी, लोकशाहीवर श्रध्दा ठेऊन समाजवाद आणू पाहाणार्या समाजवाद्यांना डोके वर काढू द्यायचे नाही. त्यांचे कार्यकर्ते तुरुंगात डांबून त्यांच्या संघटना मोडायच्या आणि कायद्याने इंटक येथे स्थापायची. अशा रीतीने काँग्रेसच सत्ता चालवील या मताने वागायचे. जनतेत असंतोष तर धुमसत आहे. समाजवादी त्याला संयमी मार्गाने संघटित करू बघतात, तर त्यांना मुंडी वर काढू द्यायची नाही. तेव्हा शेवटी कम्युनिस्टच या असंतोषाचा फायदा घेतील. आचार्य जावडेकरांनी म्हटल्याप्रमाणे मग उडेल भडका! तुमचे आस्ते कदम धोरण. ''आधी भांडवलदारांजवळ जमू दे तरी भरपूर-'' हे भुसावळचे श्री. शंकरराव देवांचे तथाकथित उदगार! आणि पुरोगामी संयमी असे समाजवादी नेतृत्व येनकेनप्रकारेण हाणून पाडायची द्वेषी, दुष्ट वृत्ती. याने शेवटी एकच होईल - गुदमरलेला असंतोष पेट घेईल. आमच्या काँग्रेसवाल्यांना त्याचीच हौस आहे असे दिसते. ''एक आम्ही राज्य करू, नाही तर कम्युनिस्ट'' असे गमतीने शब्द उच्चारतात. परंतु म्हणावे तुमचा होईल खेळ; राष्ट्राचा जाईल जीव! बर्नार्ड शॉने एके ठिकाणी सत्ताधार्या ना उद्देशून म्हटले आहे - ''If you want blood you will have it, at your own choice.'' ''तुम्हांला रक्तपाताचेच डोहाळे असतील तर तीही तुमची इच्छा पूर्ण होईल.'' समाजवादी शक्ती नष्ट होणे, म्हणजे लाल कम्युनिस्टांना मोकळे रान. मग होईल तुमची रक्ताची हौस पुरी.
चीन लाल झाला; ब्रह्मदेशात लाल भेसूर छायांचे तांडव नृत्य चालू आहे. इंडोनेशियात लाल रंगाचे वातावरण आहेच. पॅलेस्टाईनकडे लाल पंजा घुसत आहे. या खुणा आहेत. कम्युनिस्टांची शक्ती वाढायला नको असेल तर त्वरेने जनतेचा संसार नीट उभा करायला हवा. पंडित जवाहरलाल असे मागे म्हणाले. ऑस्ट्रेलियन अध्यक्ष नि मंत्री यांनी या उदगाराचे स्वागत केले. परंतु शब्दाबरोबर कृती हवी. ''भांडवलदारांजवळ आणखी जमू दे'' असे म्हणण्याने कम्युनिस्टी शक्ती कमी होत नसते.
भारतीय जनते, भांडवलदारांना काँग्रेस जरासा चिमटा घेईल. परंतु ती त्यांना निर्वीष करू इच्छित नाही. सर्पाचे विषारी दात काढून घ्या. मग ते निरुपद्रवी खुशाल खेळोत. परंतु सरकार आज त्याला तयार नाही. कम्युनिस्टांची राजवट येणे म्हणजे रक्तपात येणे, हुकुमशाही येणे, समाजाशी अविरोधी असे मर्यादित का होईना परंतु मोलाचे व्यक्तिस्वातंत्र्य गमावणे. या दोन्ही आपत्ती टाळायच्या असतील तर विचारपूर्वक आणि श्रध्देने समाजवादी पक्षाभोवती तमाम जनतेने उभे राहिले पाहिजे.
दरिद्रनारायणा! तुला सुखवणारे स्वराज्य दूर आहे. ते जवळ यावे म्हणून निर्मळपणाने जी संघटना करू पहातात, जे लोकशाही मार्गाने जाऊ इच्छितात, त्यांच्या वाटेत निखारे पेरले आहेत. परंतु गांधीजींनी दिलेली श्रध्दा घेऊन आपण जाऊ. जय की पराजय हा सवाल नसून सारे सहन करीत, न दमता, न थकता उत्कटपणे काम करणे एवढेच आपल्या हाती.