जातिधर्मनिरपेक्ष राष्ट्र व सामाजिक समता 7
ख्रिस्ती धर्मातही बडे सरदारलोक गरिबांशी लग्न लावायला तयार होत नाहीत. तो इंग्लंडचा आठवा एडवर्ड राजा. त्याला गादी सोडावी लागली! का? तर तो राजघराण्यातील एखाद्या राजकन्येशी लग्न न करता दुसर्या एका मुलीशी लग्न करता झाला म्हणून. इंग्लंडमधील लोकशाहीचा हा पराजय होता. नुसते सर्वाना मत देऊन लोकशाही येत नाही. सर्वाचा दर्जाही समान लेखायला हवा.
मानवता सर्वत्र एकच आहे. आमचे अतार घराण्यातील एक मित्र शेख घराण्यातील मुलीशी लग्न करणार आहेत म्हणून त्यांची अतार मंडळी त्यांच्यावर रागवली आहेत. अतार समाजातीलच मुलीशी लग्न लाव असा त्यांचा आग्रह. तसे पाहिले तर शेख हे अतार समाजाहूनही श्रेष्ठ मानले जातात. परंतु आपल्या समाजातील हवी हा त्यांचा आग्रह. वास्तविक पैगंबर हे मानवतेचे महान उपासक. त्यानी कालपर्यंत गुलाम असणार्या मुली मोठमोठया खानदानांना देवविल्या. ज्या एका गुलामाला त्यांनी स्वतंत्र केले त्याने आपल्या मागून खलीफा व्हावे अशी इच्छा त्यांनी प्रदर्शित केली होती. त्याच पैगंबरांच्या धर्मातील हे लोक तू अतार, मी शेख करीत बसले, मनुष्याला समता का आवडत नाही?
भारतात सर्रास मिश्रविवाह सुरू व्हावेत असे मला वाटते. मुलामुलींनी याबाबत बंड करावे. परंतु आई बापांच्या आधारावर अवलंबून असलेली मुले अशी लग्ने करू शकणार नाहीत.
स्वतंत्र व्हावयाला स्वतःचा संसार स्वतंत्रपणे चालवावयाची अंगात धमक हवी. नाही तर, ''अर्थस्य पुरुषो दासा:'' याप्रमाणे शेवेटी 'आईबाप असे म्हणतात, मग काय करायचे?' असे रडके उदगार काढणारे तरुणच सर्वत्र आढळावयाचे.
हिंदुधर्माने सर्व मिश्र विवाहांस अतःपर समंती द्यायला हवी. आज वेळ आली आहे. कधी कधी संकर हा शंकर म्हणजे कल्याणप्रद असतो. ज्यांना आपआपल्या जाती जमातीत विवाह करायचा असेल त्यांना आहेच स्वातंत्र्य. तुम्ही मिश्र विवाह करा अशी सक्ती नाही. परंतु कोणी केला तर तोही शास्त्रीय मानला जायला हवा. हिंदुधर्म त्यालाही आशीर्वाद द्यायला उभा हवा. हिंदुधर्मात हा लवचिकपणा, ही उदारता नाही? विनोबाजी धुळे जेलमध्ये म्हणाले, ''विवाह समुद्रामधले नसावेत. डबक्यातील नसावेत, नदीतील असावेत.'' आता आम्ही या डबक्यात आहोत. जरा डबकी फोडा. अगदी सागर नको असला तरी नदीत या. एकदम परदेशातील मुलगी नका करू किंवा तेथील नवरदेव नका आणू. परंतु भारतात तरी एक व्हा. आपणास नवराष्ट्र उभारावयाचे आहे ते मातीच्या डबक्यात राहून कधीच होणार नाही.
मुलगा पित्याच्या इस्टेटीत वारस असतो. मुलगी का नसावी? इस्लामी कायदा मुलीसही वारसा देतो. या बाबतीत स्त्रियांना न्याय मिळाला पाहिजे.