जातिधर्मनिरपेक्ष राष्ट्र व सामाजिक समता 3
हे मुक्ताबाईचे थोर चरण त्यांना माहीत होते. महर्षी विट्ठल रामजी शिंदे यांनी छात्रालये काढून खूप खटपट केली. हिंदुस्थानभर आर्य समाजाचे प्रयत्न चालू आहेत. परंतु अस्पृश्यता जाईना. लाखो खेडयांतून अजूनही तशीच आहे.
आणि शेवटी १९३२ मध्ये महात्माजींनी उपवास केला. स्पृश्य हिंदू समाजापासून अस्पृश्य समाजास कायम पारखे करण्याचा इंग्रजी डाव होता. महात्माजींना वेदना झाल्या. ते म्हणाले, ''हिंदु धर्मावर हा कायमचा कलंक राहील. हिंदू धर्माने आपल्या अनुदारपणामुळे आपल्या कोटयवधी बंधूंना एका क्षणात दूर केले, असे इतिहास सदैव सांगत राहील. आम्ही अस्पृश्यता लवकर घालवू. तुम्ही अस्पृश्य बंधू कायमचे दूर करू नका. नाही तर मी उपवास करीन.'' ब्रिटिश ऐकेनात. महात्माजींचे अग्निदिव्य सुरू झाले व शेवटी पुणे-करार झाला.
महात्माजींनी करारानंतर पुन्हा २१ दिवस उपवास केला. ते म्हणाले. ''हरिजनांच्या सेवेसाठी लाखो रुपये लोक देतील. परंतु माझ्या उपासाने मी अध्यात्मिक भांडवले देत आहे.'' तुमची आमची सर्वांची हृदये या कामात रंगवीत अशी महात्माजींची प्रकट इच्छा होती. १० वर्षात ही अस्पृश्यता जाईल, अशी त्यांना आशा होती. परंतु १०ची १५ वर्षे झाली, - आपणास काय दिसत आहे? किती मंदिरे उघडली? किती विहिरी मोकळया झाल्या? हॉटेले खानावळी यांतून मोकळेपणाने त्यांना जाता येते का? भाडयाने राहण्यास घर मिळते कां? कोणते उत्तर द्याल? बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, ''पुणे करार रद्द करा.'' तुम्हाला राग येतो. त्यांनी चर्चिलला तार केली तर तुम्हाल घुस्सा येतो. परंतु त्यांचे प्रेम मिळावे म्हणून तुम्ही काय केले आहे?
१९३१ मध्ये वर्तुळाकार परिषदेच्या वेळेस महात्माजी म्हणाले ''डॉक्टर आंबेडकरांना माझ्यावर थुंकण्याचा हक्क आहे. कारण हिंदूंची पापे माझ्याही शिरावर आहेत.'' आज आपण पुन्हा असेच म्हणावयास लावणार का? डॉ. आंबेडकर गांधीजींना जर म्हणाले, ''चला लाखो खेडयापाडयांतून आणि दाखवा शिवाशिवी गेली कां ते?'' त्यांना आशा होती की स्वातंत्र्यानुसार हिंदी राष्ट्र अस्पृश्यता झपाटयाने दूर करील. परंतु आपण उदासीन राहिलो.
मी सेनापतींच्या बरोबर अस्पृश्यतानिवारणाच्या वेळेस गडहिंग्लज येथे गेलो होतो. तेथील ग्रामदेवतेच्या मंदिरात हरिजनांसह आम्ही गेलो. एका वृध्द हरिजन डोळयांत पाणी आणून म्हणाला, ''आमची ग्रामदेवता आज द्दष्टीस पडत आहे.'' त्यानंतर सरकारी कायदेही झाले. सार्वजनिक जागी हरिजनांना बंदी होता कामा नये. मंदिरात त्यांना प्रवेश हवा. परंतु अजून लोकांची अढी कायमच आहे. ठिकठिकाणची पत्र येतात. वाईट वाटते. हिंदुस्थान मुक्त झाला. हरिजनांचे ग्रहण कधी सुटणार?