निसर्ग 7
ज्येष्ठ महिना संपला आहे. आषाढ सुरू झाला. आर्दा नक्षत्र होऊन गेले, तरी आर्द्रता कोठे नव्हती. कसे होईल वाटत होते. तो चारी दिशांनी ढग आले. पश्चिमेचे वारे येऊ लागले, आकाश मेघांनी भरले. जो तो अंगणात येऊन पाहू लागला. सोनारआळीची बया आते म्हणाली, ''देव भरून आला आहे.'' ढग म्हणजे देव! किती यथार्थ ! जो आधार देईल तो आपला देव. महात्माजी एकदा म्हणाले, ''चरका माझा देव! कारण तो अन्न देतो, स्वाभिमानाची भाकर देतो, स्पर्धातीत धंदा देतो.'' बया आते पावसाला देव म्हणाली. आपले धर्मग्रंथ वेद. त्यांत पर्जन्यदेवाची सुंदर स्तोत्रे आहेत. आकाशात देव भरून आला, कारुण्याच्या अमृताने ओथंबून आला आणि गडगडाट होऊ लागला. वीजही चमकली. मेघांना फाडून ती बाहेर येऊ पाही. पाऊस आला, आला! किती आनंद झाला सर्वांना ! मला संस्कृतीमधील कवी कालिदास यांच्या मेघदूतातील त्या सुप्रसिध्द चरणांची आठवण झाली. कालिदास मोठा निसर्गप्रेमी. त्याने लिहिलेल्या शाकुंतल नाटकातील शंकुतला फुलपल्लवही तोडीत नाही, इतके तिचे झाडांवर प्रेम. ''वृक्षांनो, पल्लवांवर प्रेम असूनही जी तोडीत नसे ती ही शकुंतला आज सासरी जात आहे. तिला आशीर्वाद द्या.'' असे शकुंतलेला पाळणारा कण्वॠषी म्हणतो. कालिदासाचे कोमल, प्रेमळ, निर्सगप्रेमी हृदयच येथे प्रकट होत आहे असे वाटते. पावसाळयात हा कवी आकाशाकडे बघत असावा आणि तो म्हणतो,
आषाढस्य प्रथमदिवसे
मेघमाश्लिष्टसानु
वप्रक्रीडापरिणतगज-
प्रेक्षणीयं ददर्श
-आषाढाचा पहिलाच दिवस आणि डोंगरावर ढग उतरले. मत्त हत्तीप्रमाणे जणू ते दिसत होते. परवा खरोखरच असे ढगांवर ढग आले आणि पाऊस, वारा, गडगडाट, चमचमाट सारे प्रकार सुरू झाले. मी ओटीवर बसलो होतो. सुखावलो होतो. शेजारच्या सुंदराताईची छोटी विभा आली होती. तिची आईही होती. विभा रडू लागली. मी तिला म्हटले, ''ये, पाण्यांत होडी टाकू.'' आणि मी कागदाची होडी केली. विभाने पाण्यात टाकली, तिने टाळया वाजवल्या. पागोळया मोत्यांच्या सराप्रमाणे गळत होत्या. विभाने आपले चिमुकले हात पागोळयासमोर केले. हातांवर पडलेले पाणी ती प्यायली. मौज. अंगावरचे घामोळे जावे म्हणून गोविंदभटजींचा वामन अंगणात नाचत होता.
शरदॠतु म्हणजे प्रसन्नतेचा काळ. शेते-भाते पिकत असतात. नद्या शांत वहात असतात. आकाश निरभ्र होते. रात्री स्वच्छ चांदणे पडते. अशा या रमणीय काळातच कृष्ण वेणू वाजवी. सर्व गोकुळाला वेड लावी. शरद् ॠतुतच कमळे. शरद् ॠतुतच फुलकाखरे. हजारो, लाखो सर्वत्र बागडताना दिसतील.
देवाघरचे जणू रंगीबेरंगी लखोटे. ही फुलपाखरे त्या त्या फुलांना का संदेश पोहोचवीत असतात? आणि फुलांवर ती हळूच बसतात. प्रथम ती चिमणे पंख जरा हलवतात, परंतु पुढे अगदी मिटून घेतात. जणू त्यांची समाधी लागते. अशाच वेळेस मुले त्यांना पकडतात. आणि चतुर! परींची जणू छोटी विमानेच! त्याचे पंख कसे पारदर्शक असतात. लहान मुले चतुरांना पकडतात, त्यांनी दोरा बांधतात नि सोडून देतात. परंतु या लहान प्राण्यांना, सृष्टीतील या मुक्या सजीव खेळण्यांना त्रास देणे बरे नाही.