संतांचा मानवधर्म 9
जेथे आपण सारा अहंकार विसरू असे एकतरी स्थान जगात असूदे. बैठकीत, बाजारात, कचेरीत तुझी ऐट आहे. घमेंड आहे, परंतु प्रभुसमोर तरी ती नको. तेथे धुळीतील कण हो, घमेंड आहे, परंतु प्रभुसमोर तरी ती नको. विरघळून जाणारे मातीचे ठिपळ हो. तेथेही अहंकार नेशील तर कसे होईल?
तुकाराम महाराज म्हणतात, ''जाळीन मी भेद। येथे प्रमाण तो वेद. मी सारे भेद झुगारीन. वेदांचा मला आधार आहे.'' आणि वेदांचा आत्मा त्यांच्याजवळ होता.
''वेदांचा अर्थ तो आम्हासची ठावा।
येरांनी वहावा भार माथां।''
पोथ्या-पुराणांची ओझी दुसरे बाळगतील, घोकतील, परंतु त्यातील अर्थ आम्हा संतांजवळ आहे. भेदाभेद अमंगळ म्हणून ते म्हणतात. ज्या गावातील लोक परस्परास प्रेम देणार नाहीत तेथे राहूही नये असे ते म्हणतात. जिकडे तिकडे त्यांना आत्मा दिसे. 'चले नारायण, चल माझे घरी,' असे ते रस्त्यात भेटणार्याला म्हणतात. सर्वत्र त्यांचा नारायण आहे. आपल्या सेनापतींचे असेच.
मी एकदा पुण्यात त्यांना रस्त्यात भेटलो. त्यांनी माझा हात धरला. म्हणाले, ''चला जेवायला.'' मी म्हटले. ''मी असा कसा येऊ'' ''आपण असेल ते खाऊ'' ते म्हणाले. सेनापती मुक्त पुरुष आहेत. सर्वांना जवळ घेत. कोठून आणलीत ही शिवाशिव? अद्वैताच्या या भूमीत का हे दुहीचे अपरंपार पीक? तुकाराम महाराजांनी एकाचाच विटाळ माना म्हणून सांगितले आहे.
'छळीत जो खळ। त्याचा धरावा विटाळ' जो कोणी दुष्ट छळ करीत असेल त्याला दूर उभे करा, परंतु त्याचा तर आम्ही उदोउदो करतो.
समानता हा तर धर्माचा आत्मा. ख्रिस्ती मंदिरात सारे ख्रिस्ती जातात. मशिदीत सारे मुसलमान जातात. परंतु आपल्या मंदिरात सारे हिंदु जमू शकत नाहीत. ते का देवाचे मंदिर? देवाजवळ सारे समान. ना कोणी बडा ना छोटा; ना श्रेष्ठ ना कनिष्ठ.
औरंगजेब एकदा शुक्रवारी नमाज पढायला उशीरा गेला. मशिदीत हजारो मुसलमान आधी आले होते. बादशहास पाहून सारे हटो हटो करून जागा द्या म्हणून बोलू लागले. औरंगजेब संतापून म्हणाला, 'कोणी हटू नका. जागच्या जागी बसा. येथे मी बादशहा नाही. तुम्ही प्रजा नाही. एका अल्लासमोर आपण आहोत. मी उशीरा आलो आहे. दारात बसेन.'