समाजवाद 1
या देशातील गोरगरीबांचे जीवन सुधारावयाचे असेल तर समाजवादाखेरीज तरणोपाय नाही. आर्थिक आणि सामाजिक विषमता नष्ट झाल्याखेरीज कसले स्वराज्य आणि कसली लोकशाही? समाजवादाची देशाला तीव्रतेने का गरज आहे, त्याचा हा परिचय.....
समाजवाद आणल्याशिवाय तरुणोपाय नाही. समाजवाद म्हणजे का केवळ राजकारण? समाजवाद ही एक जीवननिष्ठा आहे. 'अवघाची संसार सुखाचा करीन' असे ज्ञानदेव म्हणतात. संपत्ती एकाच्या हाती असेल, वाटेल तेवढी जमीन एकाच्या मालकीची असेल तर लोक सुखी कसे होणार? सर्वांना घरदार, पोटभर अन्न, अंगभर कपडा, स्वस्त शिक्षण, विकासाची संधी, जीवनातील ज्ञानविज्ञान, कलांचे आनंद ही सारे कसे मिळणार? आणि हा समाजवाद लोकांना पटवून त्यांच्याच मताने आणायचा यात वाईट काय आहे ? अहिंसेने लोकांना पटवून आणलेला समाजवाद आणि गांधीवाद, यांत काही फरक नाही; परंतु काही लोक उगाचच समाजवादाला शिव्या देत असतात. कोणी कोणी म्हणतात, हे परकीय तत्त्वज्ञान आहे. परदेशातील शेकडो वस्तू घ्यायला त्यांना काही वाटत नाही. आणि जीवनातील कोणताही महान विचार कोठेही उत्पन्न होवो तो आपलाच आहे. देशकालानुरूप त्या विचाराची वाढ निरनिराळी होईल. परंतु तो विचारच नको म्हणणे वेडेपणाचे, आत्मघातकीपणाचे आहे. महाभारतात एक पृथ्वीमोलाचे सूत्र सांगण्यात आले आहे. भीष्म शरपंजरी पडले आहेत. ते धर्मराजाला म्हणतात, ''धर्मा, तुझे राज्य नीट चालायला हवे असेल तर-
दरिद्रान् भर कौन्तेय
मा प्रयच्छेश्वेर धनम् ।
गरीबांची धन कर, जो आधीच श्रीमंत आहेत त्यांची भर नको करू; परंतु आज असे गरीबांचे अर्थशास्त्र येत आहे का प्रत्यक्षात?
भांडवलशाही, जमीनदारी आता दूर व्हायलाच हवी. संपत्ती देशाच्या, समाजाच्या कल्याणासाठी हवी. त्याप्रमाणे सामाजिक क्रान्तीही करावयाची आहे. कोणी जन्माने, वर्णाने श्रेष्ठ नाही. डॉ. आंबेडकरांनी पूर्वी मनुस्मृती जाळली. का नाही जाळणार? मानवी हक्कांपासून वंचित ठेवणारी नीती, तिचे भस्मच व्हावयास पाहिजे. आम्ही नाही का १९३५ चा घटना कायदा मागे जाळला? परंतु दिल्लीच्या नव्या घटनेत मानवी हक्कांची घोषणा झाली. 'मानव तेवढा समान' अशी घोषणा झाली. तेव्हा खर्या अर्थाने मनुस्मृतीतील मानवविरोधी भाग जाळला गेला. आपल्याला प्रत्यक्ष जीवनातून सर्व तर्हेची विषमता दूर करावयाची आहे. आता एखाद्या जाती-जमातीचे राज्य नाही. हे आमजनतेचे आहे. श्रमणार्यांचे आहे. ते संपत्ती निर्माण करतात, परंतु तिच्यापासून ते वंचित राहणार. हा अन्याय दूर करावयाचा आहे. सर्व युवकशक्ती या कार्यासाठी संघटित करा. प्रान्तोप्रान्तीची युवकशक्ती संघटित झाली, या समाजवादी ध्येयासाठी संघटित झाली तर उज्ज्वल भविष्य दूर नाही.