निसर्ग 6
आई मुलाला चिमण्या, कावळे दाखवीत जेवविते. तुळीशीरामायणात राम बर्फीचा तुकडा कावळयाला दाखवतो व त्याला पुढे पुढे आणतो, असे मनोरम वर्णन आहे. सेवादलाची मुले जर जंगलात आठ दहा दिवस राहतील तर पक्ष्यांची सुरेल सृष्टी त्यांच्या परिचयांची होईल आणि कधी रात्री वाघ दिसेल, तरस दिसेल, कोल्हा दिसेल. कधी जवळून सळसळ करीत साप जाईल. अनेक अनुभव येतील. अनुभवाने समृध्द करणे याहून महत्त्वाचे दुसरे काय आहे.
ॠतूंमध्ये हा पहिला वसंत । वाटे जनांना बहुधा पसंत ।
असा एक श्लोक होता. सार्या सृष्टीत नवजीवन येत आहे, बहर आहे. सृष्टी जणू रंगपंचमी खेळत आहे. लाललाल फुले सर्वत्र दिसतात. शेबरी, कळस, कांचन, सर्वत्र लाललाल फुले. मुंबईस एक प्रकारचा पारिंगा रस्त्याच्या बाजूला लावलेला आढळतो, त्यावरही लाल तुरे दिसतात. कोकणात पारिंग्यावर लाल फुले मी कधीही पाहिली नव्हती. हा का विलायती पारिंगा? कांचनाचेही किती प्रकार! कांचनाची फुले वास्तविक नावानुरुप पिवळी हवीत. कांचन म्हणजे साने. परंतु या ॠतूंत फुलणार्या कांचनाला लाल फुले असतात. जाडसर पाकळया. काही कांचनाची झाडे पावसात फुलतात.
रानात जाऊ तर नाना प्रकारची फुले लतावेलीवर आढळतील. त्यांची नावे गावे कोण जाणे? कुसरीचे वेल पांढर्या फुलांनी बहरलेले दिसतील. परवा मी एका गावी जात होतो. दुतर्फा जंगल होते. जंगलात मधून लाल काही दिसे. मला वाटे ही कसली फुले? परंतु ती फुले नव्हती. ती लालसर कोवळी पाने होती. पायरीच्या झाडांची ती पाने किती सुन्दर दिसत दुरून!
परवा वारे अशा सोसाटयाचे सुटले! माझे अंथरूण उडून जाईल असे वाटले. खाटेसकट मला वारा घेऊन तर नाही ना जाणार असा गंमतीदार विचार मनात आला. पालगड गावाकडील खर्यांकडची गोष्ट आहे. ते म्हणे रात्री अंगणात माच्यावर झोपले होते. सकाळी ते उठले तेव्हा ते तांब्याच्या माळावर होते! त्यांच्या माच्यासकट रात्री तांब्यांच्या माळावर आणून टाकले कोणी? अंतर तरी का कमी? चांगले मैल पाऊण मैल. भुताने त्यांना खाटेसकट उचलून नेले असावे, असे लोक म्हणाले. आम्ही लहानपणी अंगणात रात्री झोपलो म्हणजे ही दंतकथा डोळयासमोर येत असे. झोप लागेपर्यंत भीतीही वाटे, परंतु कधी कोणाची खाट दूर गेली नाही. परवाच्या रात्रीच्या वादळाच्या वेळेस ती गोष्ट आठवली!
वारा म्हणजे अदभुत वस्तू! तो दिसत नाही, परंतु त्याचे अस्तित्व सारखे भासते. कोठून येतो तो, कोठे त्याचे घर? तो दरीत राहतो की गुहेत राहतो? वनात राहतो की डोंगरात? आकाशात की पाताळात? वार्या वर आपले जीवन अवलंबून आहे, हवा म्हणजे वाराच ना? हवा अधिक चलनवलन करू लागली म्हणजे आपण तिला नाना नावे देतो. वारा झाडामाडांशी खेळेल, फुलांजवळ गुजगोष्टी करील, लाटांजवळ धिंगामस्ती करील, मनुष्य घामाघूम झालेला असावा, वार्याची झुळकू आली तर परमानंद होतो. परंतु हा खेळकर प्रेमळ वारा कधी कधी रुद्र रूप धारण करतो. मग तो डोंगर उडवील, समुद्रात पर्वत-प्राय लाटा उठवील. वाळूचे ढीग वर नेईल व एकदम खाली फेकील, झाडे मोडील, घरे पाडील. फुलांना नाचवणारा फुलांच्या फाडफाड थोबाडीत देईल. प्रत्येकाचे सौम्य व रुद्ररुप असते. कृष्ण परमात्म्याने अर्जुनाला विराट रुप दर्शविले तेव्हा अर्जुन म्हणाला. ''देवा, तुझे ते सौम्य रुपच दाखव.''