नवजीवन 82
‘रूपा, तुला तरी माझे आभार मानण्याची आवश्यकता नाही.’
‘हिशेब करण्याची काय जरुर? सारा हिशेब देवाघरी!’ ती म्हणाली. तिच्या डोळयांत अश्रू चमकले.
‘किती ग तू चांगली.’
‘मी चांगली?’ स्फुंदत ती म्हणाली. करूण स्मित क्षणभर अश्रूंतून मुखावर आले नि गेले.
‘जा रूपा. सुखी हो.’
ती गेली. आणि तो क्षणभर तेथे बसला. परंतु एकदम उठला त्याचेही डोळे भरून आले होते. परंतु त्याने ते पुसले. तो बाहेर पडला. त्या धर्मशाळेच्या बाजूने एक मोठा रस्ता जात होता. त्या रस्त्याने तो जात होता. पुढे नदी लागली. तेथे का ते स्मशान होते? आणि तेथे कोण आहे तो बुवा?’
‘तुम्ही काय करता येथे? तुम्ही का प्रार्थना करीत होतेत या झाडाखाली बसून?’ प्रतापने विचारले.
‘कोणाची प्रार्थना?’
‘देवाची.’
‘कोठे आहे तो देव?’
‘आकाशात.’
‘तुम्ही तेथे जाऊन पाहिलात वाटते?’
‘मी पाहिला की नाही, हा प्रश्न नाही. परंतु सर्वांनी प्रार्थना करावी.’
‘देवाला कोणी पाहिले नाही. न पाहिलेल्याची प्रार्थना कशी करायची?’
‘तुमचा धर्म कोणता?’
‘मला धर्म नाही. कारण कशावर माझी श्रध्दा नाही?’
‘कशावरच श्रध्दा नाही?’
‘माझ्यावर आहे.’
‘स्वत:वर? मग पदोपदी घसराल, चुकाल. आपण पापी जीव.’
‘स्वत:वर विश्वास ठेवायला लागल्यापासूनच मी पडलो नाही. पश्चात्ताप करायाची पाळी आली नाही. आपण दुसर्यावर विश्वास ठेवू लागतो नि नाना धर्म, संप्रदाय, पंथ उत्पन्न होतात. मग मारामार्या, कत्तली. जो तो स्वत:ला सत्य मानतो. परंतु अशा अनेक श्रध्दा असल्या, तरी आत्मा एक आहे. तो माझ्यात आहे, तुमच्यात आहे. सर्वांत आहे. म्हणून आपण स्वत:वर विश्वास ठेवू तर सारे एक होऊ. आत्मस्वातंत्र्य राखूनही विश्वैक्य अनुभवू.’
‘किती वर्षे झाली तुम्हांला हे मत स्वीकारून?’