नवजीवन 30
त्या नवराबायकोची अशी बोलणी चालली होती. तिकडे प्रताप सरळ तुरूंगात गेला. अधिकार्याला भेटला. ती चिठ्ठी त्याने दाखविली.
‘आज आता उशीर झाला आहे. उद्या दहा वाजता या. तुम्हांला येथे जवळच्या खोलीतही मुलाखत घेता येईल. उद्या या. माफ करा.’ तुरूंगाधिकार्यांनी सांगितले.
प्रताप घरी आला. तो आपल्या लेखनखोलीत बसला होता. तो विचारमग्न होता. आज त्याने दोन वर्षानंतर पुन्हा आपली दैनंदिनी लिहायला घेतली. पूर्वी तो रोज ती लिहीत असे. गेल्या दोन वर्षांत त्याने लिहिली नव्हती. त्याच्या जीवनात क्रांती होत होती. दैनंदिनीचा काय उपयोग असे मनात येऊन ती लिहिणे त्याने बंद केले होते. जणू पोरकटपणा असे त्याला वाटले परंतु आज त्याला वाटले की, दैनंदिनी लिहिणे पोरकटपणा नाही. स्वत:च्या अंतरात्म्याजवळचा तो संवाद असतो. इतके दिवस त्याचा आत्माच झोपी गेलेला होता. आता त्याला जागृती आली होती. हे दिव्य आत्मतत्त्व प्रत्येकात आहे. त्याच्याशी बोलणे म्हणजे दैनंदिनी.
‘मी काल कोर्टात गेलो. ज्यूरीत होतो म्हणून. आणि मी जागा झालो. जिला मीच भुलविले. मोहदरींत पाडले, ती तेथे कैदी-पोषाखात गुन्हेगार म्हणून होती. माझ्याच निष्काळजीपणामुळे तिला काळया पाण्याची शिक्षा झाली. आज तिला भेटण्यासाठी म्हणून मी गेलो. भेट मिळाली नाही. तिला मी भेटेन. हर प्रयत्नांनी भेटेन. तिच्याजवळ सारे कबूल करीन. माझ्या कृतकर्मांचे प्रायश्चित तिच्याशी लग्न लावूनही मी घेऊन. लग्न लावून पापाची निष्कृती होईल का? मी शक्य ते सारे करीन. प्रभू मला मार्ग दाखवो. हात धरून मला चालवो. आज मनात शान्ति आहे, आनंद आहे. अंधार दूर झाला आहे.
आणि रूपाची मन:स्थिती कशी होती? शिक्षा होऊन ती तुरूंगात गेली. त्या रात्री तिला झोप नाही आली. कोर्टातील सारे दृश्य तिच्या डोळयांसमोर होते. परंतु प्रतापला तिने ओळखले नव्हते. ते पूर्वीचे निष्पाप बालपण, ते प्रेम, त्या मधुर मंगल स्मृती, त्या तिने खोल पुरून टाकल्या होत्या. ती त्या गोष्टी कधीही आठवीत नसे. त्या स्मृती अती दु:खकारक होत्या. ती त्या विसरून गेली. स्वप्नांतही त्यांची आठवण तिला येत नसे. इतका जाड पडदा त्यांच्यावर तिने टाकला होता. तो पहिल्या भेटीतील प्रताप-त्या वेळेस किती तरूण! त्या वेळेस त्याला मिशीही फुटली नव्हती. आणि आज त्याला थोडे टक्कल पडले होते.