Get it on Google Play
Download on the App Store

नवजीवन 79

‘तुम्ही शांत पडून रहा. तुम्ही उमदे तरूण आहात. आजारातून बरे व्हा. मुक्त होऊन या. बध्द बांधवांना मुक्त करायला दीर्घायू व्हा.’ प्रताप त्याला थोपटीत म्हणाला.

‘मी बरा नाही होणार. एक-दोन दिवस फार तर मी जगेन. माझा आत्मा मी तुमच्यासमोर मी ओतला. आम्हा तरूणांबद्दल गैरसमज नका करून घेऊ. आम्ही निरुद्योगी वेडपट नाही.’ तो तरूण म्हणाला.

तिकडे जेवणे झाली. एकेकजण येऊ लागला. रूपा, उषा, प्रसन्न, दिनकर वगैरे सर्व मंडळी आली.

‘कसा आहे ताप?’ अरूणाने विचारले.

‘सारखा बोलत होतास ना?’ दिनकरने प्रश्न केला.

‘तो तुमची बाजू मांडीत होता.’ प्रतापने सांगितले.

‘आमची बाजू? त्याला काय कळे आमची बाजू? त्याला एकदम क्रांती व्हायला हवी आहे. लोकांना समजावले पाहिजे. त्यांची विचारशक्ती वाढविली पाहिजे. जोपर्यंत जनता जाणती होत नाही तोपर्यंत आमच्या क्रांतीतून हूकूमशहाच निर्माण व्हायचे. माणसे म्हणजे का मडकी? एखाद्याने त्यांना थोपटून थोपटून स्वेच्छेनुसार आकार    द्यावा? लोकांत जागृती करणे कठीण काम आहे. ते अशा तरूणांना नको असते. परंतु वर्षानुवर्षे निराशा गिळून, अपमान, निंदा, टीका सहन करून समाजाची वैचारिक, नैतिक पातळी उंच करण्यासाठी अहोरात्र झटणे हे मी खरे क्रांतीकार्य समजतो.’ प्रसन्न म्हणाला.

‘ते कार्य कधी पुरे होणार महाराज? त्याला युगानुयुगे लागतील. तोवर का ते रक्तशोषण चालू द्यायचे?’ दिनकरने विचारले.

‘तर का भांडवलदार गोळया घालणार? सर्वांत सोपा मार्ग म्हणजे विरोधकांना ठार करणे, असे तुम्हांस वाटते?’ प्रताप म्हणाला.

‘गोळया घातल्या म्हणून काय बिघडले? तुम्हांला ते पाप वाटते. आम्हांला वाटत नाही. हजारो वर्षे कोटयावधी जीवने यांनी मातीमोल केली. ती विराट हिंसा दिसते का तुम्हांला? लाखो लोक भुकेकंगाल, लाखो लोकांना घरदार नाही; वस्त्र नाही; ज्ञान नाही; आणि इकडे अपरंपार चैन. पाणी बाधेल म्हणून सोडावॉटर पीत आहेत! उन्हाळयांत थंड हवेच्या ठिकाणी जात आहेत! ही का अहिंसा? लोकांना इकडे राहायला वीतभर जागा नाही. जिन्याखालीसुध्दा पशूंप्रमाणे माणसे झोपतात. आणि तिकडे रिकामे बंगले पडले आहेत. नुसते झकपक फर्निचर तेथे ठेवलेले. त्यांच्यावर कुलंगी कुत्री बसतात. हिंसा, अहिंसा, तुम्ही नका शिकवू आम्हांला. आम्हीही खूप विचार केला आहे.’ दिनकर म्हणाला.

‘परंतु शासनसंस्था जाऊन सारा व्यवहार सहकारी पध्दतीने चालावा असे वाटत असेल तर मानवी मनच सुसंस्कृत नि उदार नको का व्हायला? शासनसंस्था म्हटली की, थोडा फार अन्याय, हिंसा इत्यादी गोष्टी आल्याच. म्हणून मानवी मन उन्नत व्हावे यासाठी प्रयत्न करावेत असे मला वाटते. इतिहासात झटपट रंगार्‍याचा मार्ग नाही. वाटते, आता रामराज्य येईल, परंतु ते नेहमी दूरच राहाते. ते ते क्रान्तीवीर श्रध्देने, या क्षणी सुवर्णयुग, सत्ययुग येईल या आशेने सर्वस्व अर्पायला उभे राहतात. परंतु प्रत्यक्षात काय दिसते? फ्रेंच क्रांतीतून शेवटी हुकूमशहा नेपोलियन उभा राहतो. कबूल, काही मानवी प्रगती झाली. काही कल्पना जगभर पसरल्या. परंतु विश्वाची प्रगती, मानवी जीवनाची प्रगती मुंगीच्या पावलानेच होत आहे. इतिहासाचा हा धडा आहे. तुम्ही इतिहासाचे विवेचन अर्थिक संबंधाच्या दृष्टीने केलेत, तरी उद्या सारे प्रश्न सुटणार आहेत असे मानत असाल तर तुम्ही भ्रमात आहात असे मी म्हणेन. इतिहासाची सर्वश्रेष्ठ शिकवण अशी आहे की, खर्‍या विकासाला जवळचा मार्ग नाही. तुम्हाला वाटेल की, आपण एखाद्या पक्षाची हुकूमशाही स्थापून, सारे प्रचारतंत्र हाती घेऊन, छापखाने, पुस्तके, सारे एकरंगी, एका विचाराचे प्रसिध्दून ठराविक नमुन्याचा मानव निर्मू. परंतु ही भूल आहे. मानवाचे मानवशास्त्र आम्ही बदलू, अशी तुम्हांला घमेंड आहे.

नवजीवन

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
नवजीवन 1 नवजीवन 2 नवजीवन 3 नवजीवन 4 नवजीवन 5 नवजीवन 6 नवजीवन 7 नवजीवन 8 नवजीवन 9 नवजीवन 10 नवजीवन 11 नवजीवन 12 नवजीवन 13 नवजीवन 14 नवजीवन 15 नवजीवन 16 नवजीवन 17 नवजीवन 18 नवजीवन 19 नवजीवन 20 नवजीवन 21 नवजीवन 22 नवजीवन 23 नवजीवन 24 नवजीवन 25 नवजीवन 26 नवजीवन 27 नवजीवन 28 नवजीवन 29 नवजीवन 30 नवजीवन 31 नवजीवन 32 नवजीवन 33 नवजीवन 34 नवजीवन 35 नवजीवन 36 नवजीवन 37 नवजीवन 38 नवजीवन 39 नवजीवन 40 नवजीवन 41 नवजीवन 42 नवजीवन 43 नवजीवन 44 नवजीवन 45 नवजीवन 46 नवजीवन 47 नवजीवन 48 नवजीवन 49 नवजीवन 50 नवजीवन 51 नवजीवन 52 नवजीवन 53 नवजीवन 54 नवजीवन 55 नवजीवन 56 नवजीवन 57 नवजीवन 58 नवजीवन 59 नवजीवन 60 नवजीवन 61 नवजीवन 62 नवजीवन 63 नवजीवन 64 नवजीवन 65 नवजीवन 66 नवजीवन 67 नवजीवन 68 नवजीवन 69 नवजीवन 70 नवजीवन 71 नवजीवन 72 नवजीवन 73 नवजीवन 74 नवजीवन 75 नवजीवन 76 नवजीवन 77 नवजीवन 78 नवजीवन 79 नवजीवन 80 नवजीवन 81 नवजीवन 82 नवजीवन 83 नवजीवन 84 नवजीवन 85