नवजीवन 15
‘काही नाही. कशाविषयी मी बोलणार? मला खरोखरच जेवढे माहीत आहे ते मी सांगितले आहे. मी निरपराधी आहे. प्रभूला सारे माहीत. आता वाटेल ते करा.’
‘आणखी काही सांगायचे आहे?’
‘काही नाही. मी सारे सांगितले.’
आता कोणाला काही सांगायचे नव्हते. ज्यूरी उठली. आपसांत विचारविनिमय करण्यासाठी सारे गेले.
हीच रूपा. होय, तीच ती. तिचा नि प्रतापचा काय होता संबंध? काय आहे ती कथा?
त्या दोघांची प्रथम भेट झाली तेव्हा प्रताप कॉलेजमध्ये शिकत होता. तिसर्या वर्षात होता. तो आपल्या त्या दोन मावश्यांकडे गेला होता. त्याला सुट्टी होती. जमीनदारी नष्ट करावी या विषयावर त्याला निबंध लिहायचा होता. म्हणून तो मावश्यांकडे निवान्त वेळ मिळेल म्हणून गेला होता. त्याच्या बहिणीचे नुकतेच लग्न झाले होते. आई विश्रांतीसाठी महाबळेश्वरी गेली होती. आणि तो इकडे आला होता. मावश्यांचे भाच्यावर फार प्रेम होते. त्याच्यावर कोणीही प्रेम केले असते. आणि त्या दोन्ही मावश्यांच्या मिळकतीचा, मालमत्तेचा तोच पुढे वारस व्हायचा होता. तो त्यावेळेस अगदी तरूण होता. नुकतीच त्याची विशी संपली होती. पंचविशी अजून दूर होती. तारूण्य म्हणजे धन्यतम जीवन.’ त्या वेळेस आपण महान् ध्येये डोळयांसमोर ठेवीत असतो. आकांक्षा उच्च असतात. पूर्णतेला गाठावे असे वाटत असते. जीवन कृतार्थ करावे असे विचार मनात उसळत असतात. त्याला आईच्या माहेरची हजार एकर जमीन मिळाली होती. वडीलांची जमीन त्याने कुळांना देऊन टाकली होती. जमीनदारी पध्दतीतील भेसूर, क्रूरता, हिडीस अन्याय यांचे त्याला दर्शन झाले होते. त्याच्या सदसदविवेकबुध्दीस ते सहन होईना. दुनिया सुखी व्हावी, श्रमणारे सुखी व्हावेत म्हणून त्याने त्याग करायचे ठरविले होते. त्याप्रमाणे वडिलांची जमीन त्याने कुळांना वाटून दिलीही. मावश्यांकडे तो जेव्हा आला तेव्हा अशा ध्येयवादी विचारांचा तो होता.
तो उत्साहाने उसळत होता. तो लौकर उठे. पहाटेस नदीवर आंघोळीस जाई. धुके पडलेले असे. एक प्रकारचे गूढ सौंदर्य त्याला सर्वत्र प्रतीत होई. फुले, तृणे यांवर दव पडलेले असे. जणू झिरझिरीत ओढणी सृष्टीनें घेतली आहे असे दिसे. ते राजहरित सुंदर वातावरण बघत बघत तो घरी येई. नंतर तो लेखनांत रमे. नाना संदर्भग्रंथ चाळी, कधी कधी तो शेतातूंन हिंडे, मळयांतून फिरे. शेतांचा तो स्वच्छ, सुंदर, निरोगी सुगंध त्याला आवडे. कधी जंगलात तो एकटाच फिरत जाई. तो पाखरे बघी, वृक्षवेली पाही. एखाद्या विशाल वृक्षाच्या बुंध्याशी तो बसे. नि सृष्टीशी एकरूप होई. तिसरे प्रहरी तो जरा वामकुक्षी करी. मग बागेत फिरे. एखादे वेळेस सकाळी घोडयावर बसून तो रपेट मारी. कधी तो नदीतीरी जाई, नौकाविहार करी. कधी रात्री पिठासारख्या चांदण्यात तो बाहेर फिरायला जाई. त्याला झोप येत नसे. थकवा ही वस्तूच त्याला माहीत नव्हती. जीवनातील निष्पाप आनंदात तो मस्त होता. त्याचे हृदय आनंदाने, उदारतेने ओथंबलेले असे. असा त्याचा सुट्टीचा पहिला महिना गेला. सुख, शांती, आनंद, उल्हास, उत्साह यांनी भरलेले त्याचे विश्व होते. आईच्या प्रेमळ पाखरीखाली तो वाढलेला होता. तो विशुध्द होता. स्फटिकवत् निर्मळ होता. कधी त्याच्या मनात स्त्रीविषयक विचार आलाच, तर तो पत्नी म्हणूनच येई. ज्यांच्याजवळ तो लग्न करू शकत नव्हता, त्या त्याला माता होत्या.