नवजीवन 36
शेवटी ती गेली. प्रताप विचार करीत माघारी गेला. मी आपण होऊन तिची क्षमा मागायला, तिला मदत करायला आलो आहे असे पाहून ती विरघळलेल अशी त्याची अपेक्षा होती. परंतु त्याचा निराळाच अनुभव आला. रूपाला स्वत:च्या स्थितीचे वाईट वाटत नव्हते. तिला कैदी म्हणून लाज वाटत नव्हती. एवढेच नव्हे तर वेश्यापणाचीही तिला लाज वाटत नव्हती. तिला वेश्यापणात जणू आनंद वाटत होता. त्या धंद्याचा जणू तिला अभिमान वाटत होता. ज्याला त्याला आपला धंदा महत्त्वाचा वाटतो. नाही तर त्याच्या जीवनाला अर्थ काय? आपणांस वाटते चोर, डाकू, गुप्त पोलीस, वेश्या इत्यादींना स्वत:चा धंदा वाईट वाटत असेल; परंतु तसे नसते. त्यांनाही आपला धंदा महत्त्वाचा वाटत असतो. रूपालाही तसेच वाटे. सारे पुरूष, म्हातारे, तरूण, सुशिक्षित, अशिक्षित, विद्यार्थी, बडेबडे अंमलदार, सारे माझ्याकडे येतात. त्यांची इच्छातृप्ती करणे न करणे माझ्यावर अवलंबून आहे. माझा अनुभव हे सिध्द करीत आहे, हे सारे लोक भोगासक्त असतात. आम्हां वेश्यांशिवाय त्यांना कोण आहे? आमचेही महत्त्वाचे स्थान आहे. आम्ही का लाजावे? ज्या जगात सर्वत्र अत्याचार, वंचना, अन्याय सर्रास चालू आहेत, त्या जगांतल्या आम्हीही. आम्हीही त्यांत शोभून दिसतो. रूपा जर ही दृष्टी सोडती तर तिला काय किंमत राहती? प्रतापराव तिला पुन्हा निराळया जगांत नेऊ पाहात होता, परंतु तिच्या लक्षात ते येताच तिने कठोर मुद्रा धारण केली. त्याच्या विचारांविरूध्द तिने बंड पुकारले. वर उसळून येणार्या जुन्या सृती आणि तिचे आजकालचे जीवन यांत भेसूर विसंगती होती. तिची चर्या पाहतांच ‘लग्न करीन’ हे शब्द तो उच्चारू शकला नाही. ‘मी पुन्हा बोलेन, सारे सांगेन, तू बहिणीहून अधिक’ एवढेच तो सूचक बोलला. त्याला स्पष्ट सांगवेना.
प्रताप त्या बॅरिस्टराकडे ठरल्याप्रमाणे गेला. साहेब कचेरीत होते. एक व्यापारी आला होता. कारकुनाजवळ तो बोलत होता.
‘या प्रतापराव, बसा. त्या व्यापार्याला जाऊ दे. अहो, दहा-वीस लाखांची ती आसामी आहे. परंतु पैशासाठी मरेल. फीसाठी घासाघीस करीत बसेल. सारखी बडबड चालू ठेवील. नमुने आहेत एकेक. जाऊ दे. ती तुमची केस मी सारी अभ्यासून ठेवली आहे.’
इतक्यांत कारकून आत आला.
‘काही कमी करता येईल का फी?’
‘त्याला साफ सांगा की काहीही कमी होणार नाही.’
‘तेवढी द्यायला तो तयार नाही.’
‘जा म्हणावे. आम्ही का उगीच फी मागतो? सारी कायद्याची पुस्तके उलथीपालथी करावी लागतात. रात्र रात्र जागरणे करावी लागतात. मुद्दे काढावे लागतात. डोके कसे सुन्न होते. आम्ही रक्ताचे पाणी करतो. जाऊ दे. प्रतापराव, तुमची केस वाचली. अपिलास जागा नाही. मी उगीच खोटे कशाला सांगू? आपण शिक्षा रद्द व्हावी म्हणून प्रयत्न करू. अर्ज कसा करायचा त्याचा विचार केला आहे, सारे मुद्दे काढले आहेत.’
‘अर्ज करून होईल का काम? जेथे अर्ज करायचा तेथे कोण आहे मुख्य?’
‘बरोबर विचारलेत. तेथे जो मुख्य असेल त्याच्यावर अवलंबून असणार सारे.’
‘लौकरच कोणाला भेटायला हवे का?’
‘हो. म्हणावे, अर्ज लौकरच विचारात घ्या. नाही तर पुढे तीन महिने थांबावे लागेल. तेथेही काम झाले नाही तर राजाकडे दयेचा अर्ज करू.’
‘तुम्ही अर्ज वगैरे नीट लिहून ठेवा. तुमची फी?’
‘कारकून सांगतील.’
तो बाहेरच्या खोलीत आला. कारकुनाने शंभर रूपये सांगितले.