नवजीवन 17
प्रतापच्या दोन्ही मावश्यांना चिंता होती; परंतु तिकडून आईचे निघून येण्याविषयी बोलावणे आले; आणि प्रताप परत जायला निघाला. त्याला जाताना खिन्नता वाटली नाही. त्याचे प्रेम निर्मळ होते. ते निरपेक्ष होते. तो आनंदाने उसळत होता. स्टेशनवर न्यायला गाडी आली. मावश्या पोचवायला जात होत्या. आणि रूपा तेथेच उभी होती. तिचे टपोरे डोळे भरून आले होते. तेव्हा तोही सद्गदित झाला. त्याला प्रेमाच्या खोलीची जाणीव झाली. आपण काही तरी मोलाचे येथे सोडून जात आहोत, असे त्याला वाटले. काहीतरी सुंदर, मधुर असे सोडून जात आहोत, असे त्याला वाटले. काहीतरी सुंदर, मधुर असे सोडून जात आहोत, असे त्याला वाटले. त्याला आता वाईट वाटले.
‘जातो हं रूपा.’ तो म्हणाला.
‘ये हो.’ ती म्हणाली. आपले अश्रू रोखून तेथे ती उभी होती आणि तो गेला. गाडीत बसून स्टेशनवर गेला. मावश्या बरोबर गेल्या. रूपा धावत पळत घरात गेली आणि ती मुक्त कंठाने पोटभर रडली.
आणि पुन्हा तीन-चार वर्षानंतर तो आपल्या मावश्यांकडे आला. त्याचे शिक्षण संपले होते. ध्येयवाद संपला होता. तो लष्करात मोठया हुद्यावर लौकरच जाणार होता. तो आता पूर्वीचा प्रताप नव्हता. प्रामाणिक, नि:स्वार्थी, निर्मळ नि उदार प्रताप मरून त्याच्या जागी स्वार्थी, भोगी प्रताप जन्माला आला होता. तो आता एक अहंकारी नि भ्रष्ट तरूण झाला होता. त्याचा त्याग मावळला होता. केवळ सुखोपभोगासाठी जगणारा तो झाला होता. पूर्वी तो आला होता तेव्हा त्याची दृष्टी या विश्वाकडे आश्चर्याने बघे. जगाचे, विश्वाचे कोडे सोडवावे; सृष्टीत लपून राहिलेल्या प्रभुला हुडकून काढावे अशी त्याची दृष्टी होती. आता ते काही एक उरले नव्हते. त्याच्यासमोर आता सृष्टीचे कोडे नव्हते. गहन, गंभीर, गूढ असे काही एक नव्हते. आता सारे सोपे, सुटसुटीत झाले होते. खावे, प्यावे, मजा करावी. यांत त्याचे सारे जग होते. यांत त्याचे सारे तत्त्वज्ञान होते. सदसदविवेक बुध्दी मरून पडली होती. पूर्वी त्याला या सृष्टीशी एकरूप व्हावे असे वाटे. निसर्गाच्या संगीतसिंधूत तो डुंबे. सृष्टिच्या महाकाव्यात रमे. कधी तो कवि होत असे, तर कधी खोल दृष्टीने पाहणारा तत्त्वज्ञानी होऊ पहात असे. त्या वेळेस स्त्रिया म्हणजे गूढ वस्तू. सौंदर्याने भरलेल्या असे त्याला वाटे. त्यांच्याकडे तो आदराने, कौतुकाने पाही. आता केवळ भौगैकदृष्टीने तो त्यांच्याकडे बघे. स्त्री म्हणजे उपभोगाची चीज याहून आता त्याला काही अधिक वाटत नसे. पूर्वी त्याला पैशांची फारशी जरूर लागत नसे. आता कितीही पैसे असले तरी त्याला पुरेसे होत नसत. आईजवळ एकदा पैशासाठी तो भांडलाही. पूर्वी तो आला होता, तेव्हा तो आत्म्याची, उदार भावनांची, सत्य, शिव, सुंदर यांची पूजा करणारा होता. अहंच्या पलीकडे त्याला आता काही दिसत नव्हते. पूर्वी तो स्वत:वर विश्वास ठेवी; स्वत:ची मते, विचार, सदसदविवेकबुध्दी यांना तो मानी. एखादी गोष्ट, एखादा विचार, आपल्याला पसंत आहे की नाही हे तो पाही. परंतु आता तो केवळ अनुकरण करणारा झाला होता. दुसर्याप्रमाणे स्वत:ही वागू लागला होता. आता त्याला कधीही निर्णय घ्यावा लागत नसे; मनात विचार करावा लागत नसे. कसे जगावे हे लोकांनी ठरवलेच आहे. सुख भोगावे, दारू प्यावी, व्यभिचार करावा, फसवावे, दंभ दाखवावा इत्यादी गोष्टी म्हणजे जणू जगाची रीत. पूर्वी तो स्वत:च्या विचारांप्रमाणे वागे, स्वत:शी सत्यनिष्ठ राही. आणि म्हणून लोक त्याला हसत, त्याला बावळट, अव्यवहारी म्हणत. या जगात जगायला तू नालायक असे त्याला म्हणत. परंतु आता तो भोगी झाल्याबरोबर, खुशालचेंडू चंदुलाल झाल्याबरोबर लोक त्याची वाहवा करू लागले. ज्या वेळेस त्याला वेडपट म्हणून संबोधण्यात येई. भोळा सांब असे त्याला तिरस्काराने म्हणत. परंतु आता तो पाणचट कादंबर्या वाचू लागला, अश्लील बोलू लागला, वागू लागला; आणि लोक त्याला उत्तेजन देऊ लागले.