नवजीवन 18
आता हा जरा माणसाळला, माणसांत आला असे त्याला ते म्हणू लागले. पूर्वी त्याच्या गरजा किती कमी होत्या. दारिद्रयात तो आनंद मानी. दारूला शिवतही नसे. ‘मोठे आले साधू जणू’ असे त्याला लोक उपहासाने म्हणत. आता तो शिकार करू लागला. निरपराधी पशुपक्षी मारू लागला. तोंडाचे धुराडे करू लागला. आणि सारे लोक त्याची नावाजणी करू लागले. त्याचे आप्तेष्टमित्र ‘आता हा सुधारला’ असे कौतुकाने म्हणू लागले. लग्न होईपर्यंत मी निर्मळ राहीन, स्त्रियांशी अनैतिक संबंध ठेवणार नाही असे तो पूर्वी म्हणे, त्या वेळेस त्याला लोक हसत. आता तो व्यभिचार म्हणजे नैसर्गिक गोष्ट मानी आणि आईही त्याच्या या वृत्तीचे कौतुक करू लागली. ‘माझा बाळ ‘बोवा’ वगैरे होईल की काय अशी भीती वाटे; परंतु आता त्याची गाडी रूळावर नीट आली आहे. हंसतो, खातो, पितो;’ असे आई समाधानपूर्वक बोले! पूर्वी त्याने वडिलांची सारी जमीन देऊन टाकली तेव्हा, ‘तू अक्कलशून्य आहेस’ अशाने का शेतकरी सुधारणार आहेत? आळशी होतील, दारू पिऊ लागतील, त्यांच्याजवळ का दिडकी शिल्लक राहणार आहे?’ असे त्याला सारे म्हणाले; परंतु आता प्रताप जुगारी बनला, शर्यतींचे घोडे उडवू लागला, तर त्याची पाठ थोपटण्यात येऊ लागली. ‘आता खरा राजबिंडा मर्द तरूण शोभतोस. आता तू खरा पुरूषार्थशाली, आता पुरूषाप्रमाणे वागायला लागलास.’ असे त्याला प्रशस्तिपत्रक जेथे तेथे मिळू लागले. पूर्वी आत्म्यावर श्रध्दा असताना जे जे त्याला मंगल वाटे ते ते त्याला आता नकोसे वाटे. पूर्वीचे सारे सोडून तो आता निराळे जीवन जगू लागला. त्याची आंतरिक धडपड बंद पडली होती. आरंभी आरंभी हे जीवन, हे फुलपाखरी जीवन जगताना त्याला संकोच वाटे. मनात बोचणी असे; टोचणी असे. परंतु पुढे सदसदविवेक बुध्दीची नांगी बोथट झाली एवढेच नव्हे तर ती जणू उरलीच नाही. हळूहळू तो पूर्णपणे नवरंगी बनला. ओढू लागला, पिऊ लागला, भोगू लागला. प्रताप आत्यंतिक वृत्तीचा होता. जिकडे जाईल तिकडे तो वेगाने जाई. या नव्या विलासी जीवनाकडेही तो बेफाम होऊन जाऊ लागला. भरधाव निघाला गडी. आतला आवाज साफ गुदरमरला. प्रभूची मुरली बंद झाली आणि लष्करात गेल्यावर तर कळस झाला. लष्करात सारेच निराळे. लढाई जेव्हा नसते तेव्हा या लोकांना उपयोगी अशा कोणाताही उद्योग नसतो. लढाईपर्यंत पोसायचे. लढाईत बळी द्यायचे; गणवेष, निशाणे, आपापली पथके, पदके, याचाच अभिमान! सारे झकपक, लखलखीत असत. तो तलवार फिरवी, बंदूक चालवी, दुसर्यांनाही शिकवी. हाच तेथे नित्यचा उद्योग. आणि हा उद्योग संपल्यावर दारू, नाच, सारे प्रकार. दारू पिणे तर जणू धर्म. रोजचे ते कर्तव्य. प्रताप चांगल्या मोठया हॉटेलात जाई. तेथे नाचरंग, तमाशे असायचे. तो नाटके पाही. रात्री मदिरा पिऊन मदिराक्षींना मिठया मारी. कधी पत्ते खेळत बसे, तेथेही जुगार असे. केव्हा तरी रात्री झोपे. असा हा लष्करी प्रताप होता. इतर लोकांना थोडी तरी लाजलज्जा असते. तेथे लाज न वाटता उलट अभिमान वाटत असतो. ‘आम्ही उद्या रणांगणावर मरणारे; आम्हांला सारे भोगून घ्यायचा हक्क आहे. कधी मरू त्याचा काय नेम? म्हणून आम्ही असे वागतो. त्यात काय वाईट आहे?’ असे लष्करी मनुष्य म्हणतो.