नवजीवन 1
शहरांतून माणसांनी निसर्गाची जवळजवळ हकालपट्टी केलेली असते. जिकडे तिकडे फरसबंदी असते. कोठे झाडमाड उगवू नये, हिरवे गवत दिसू नये असे केलेले असते. दाट वनराजी कोठेच नसते. सर्वत्र तो कारखान्यांतील चिमण्यांचा धूर. असे असले तरीही वसंत ऋतुचे वैभव तेथेहि प्रभाव पाडल्याशिवाय राहात नाही. किती झाले तरी वसंत तो वसंत.
ती वासंतिक प्रभात वेळा होती. झाडे सुंदर दिसत होती. त्यांच्या त्या नूतन पल्लवांवर रमणीय सूर्यप्रकाश पडला होता. चिमण्या, कबुतरे, नाना पक्षी घरटी तयार करण्यासाठी आनंदाने श्रमत होती. सृष्टीत एक प्रकारचा निष्पाप आनंद भरून राहिला होता. झाडे, फुले, पक्षी, लहान मुले सर्वांनी सभोवती मधुरता पसरली होती. परंतु वयात आलेली माणसे काय करीत होती? ती एकमेकांना फसवीत होती. छळीत होती. वास्तविक ईश्वराने ही पृथ्वी आनंदासाठी दिली. येथे प्रेम पिकवा, शान्तीने, सुसंवादाने नांदा, असे जणू प्रभू सांगत आहे. परंतु मनुष्यप्राणी या सृष्टीचे नंदनवन करण्याऐवजी जणू स्मशान करतो. सर्वत्र लूटमार, पिळवणूक, गुलामगिरी यांचे साम्राज्य दिसते. मनुष्य कधी सुधारणार?
तुरूंगातील लोकांना वसंत ऋतू काय, शरद ऋतू काय, सारे सारखेच. तेथे तोच छळ, त्याच शिव्या, तीच अखंड मानहानी, त्याच अंधारकोठडया. तेथे वासंतिक वारा मोकळेपणाने कोठे फिरणार? ती पाहा, अपराधी स्त्री-कैद्यांना ठेवायची जागा. त्या लहान खोल्या! त्या एका खोलीतील एका स्त्री-कैद्याला खटल्यासाठी आज कोर्टात न्यायचे आहे. दुसरेही दोन आरोपी आहेत. परंतु त्यांना दुसरीकडून नेण्यात यायचे होते.
अंधार्या बोळातून तुरूंगाधिकारी जेथे स्त्री-कैद्यांना ठेवण्यात येत असे, तेथे आला. तेथे कोंदट, कुजट हवा होती. घाण येत होती. तो अधिकारी करडया कठोर आवाजात म्हणाला, ‘रूपा, तुला न्यायालयात जायचे आहे. तयार हो. वेळ नको लावू.’
औरत-कोठडीवरची नायकीण तेथे होतीच.
लौकर आटप. मघापासून सतरांदा सांगितले तरी ऐकेल तर हराम. यांच्या गप्पा कधी संपत नाहीत. लाज नाही मेलीला. आटप लौकर.’ ती गरजली.
त्या कोठडीत दहा-वीस स्त्रिया होत्या. नाना प्रकारच्या गुन्ह्यांसाठी त्यांना शिक्षा झालेल्या होत्या. त्या कोठडीत उवा, डास, ठेकूण यांची साम्राज्यसत्ता होती. त्या कोठडीत पराकाष्ठेची दुर्गंधी होती. त्या फाटक्या चटया, त्या फाटक्या घोंगडया, सारे ब्रम्हांड त्यात होते. आणि रूपा तेथे होती! तिने केस जरा नीटनेटके केले. पदर वगैरे जरा नीट घेतला. ती तयार झाली. नायकिणीने कोठडीचा दरवाजा खोलला.
‘चल हो बाहेर.’ ती ओरडली.
‘रूपा, प्रश्न विचारतील तेवढयांचीच उत्तरे दे. अधिक बोलू नकोस. जरूरीपेक्षा बोलण्याने आपण अधिकच गुंतून जातो. मी सांगितलेले ध्यानात ठेव, म्हणजे बरेवाईटसे फारचे व्हायचे नाही.’ कोठडीतील एका बाईने सल्ला दिला.