नवजीवन 12
रामधन म्हणाला, ‘मला काही माहीत नाही. मी पूड दिली नाही. मी निरपराधी आहे.’
त्याने आरंभी पूड दिल्याचे कबूल केले होते. परंतु आता त्याने सारेच नाकारले.
त्या तिघांवर चोरीचा आरोप ठेवण्यात आला होता. तिघांनी बॅगेतील पैसे आपसांत वाटून घेतले असले पाहिजेत. तिघांवर विषप्रयोगाचाही आरोप ठेवण्यात आला होता. अशा या खटल्याचा आज निकाल होता.
ज्यूरीसमोर आज काम चालायचे होते.
‘रामधन, आरोप कबूल आहे?’ प्रश्न करण्यात आला.
‘नाही. हॉटेलात जे पाहुणे येतात, त्यांची बडदास्त ठेवणे एवढेच माझे काम.’
‘गुन्हा कबूल आहे की नाही? होय की नाही तेवढे सांग. तुझे इतर पुराण नको.’
‘नाही. मी फक्त...’
‘होय की नाही?’
‘गुन्हा कसा कबूल करू?’
‘तू ग? रमी, तुला कबूल आहे?’
‘मी काही एक केले नाही. खोलीत गेले नाही. याच डाकिणीने सारे केले आहे.’
‘ते सारे मागून. होय की नाही उत्तरे दे.’
‘मी खोलीत गेले नाही, पैसे घेतले नाहीत, विष दिले नाही.’
‘गुन्हा नाही ना केलास?’
‘नाही.’
‘रूपा, तू?’
‘मी निरपराधी आहे. मी फक्त त्याने सांगितलेले चाळीस रूपये नेले. अंगठी त्यानेच दिली. चोरीच्या पैशांतून मी अंगठी घेतली नाही.’
‘तू पैसे नाही चोरलेस?’