नवजीवन 9
‘ज्यूरीतील सारे हजर आहेत?’
‘होय.’ तो व्यापारी म्हणाला.
सर्वांची नावे उच्चारण्यात आली. सर्वांनी हजेरी दिली. सारे गंभीर तोंडे करून बसले. आपण कोणी तरी फार मोठे जबाबदार आहो असे त्यांना वाटत होते. अपराधी कैद्यांना आणण्यांत आले. आरोपी तीन होते. त्या तिघांचे आगमन होतांच सर्वांनी त्यांच्याकडे पाहिले. दोन स्त्रिया होत्या. एक पुरूष होता. रूपाकडे बघताच सारे चलबिचल झाले. त्यांची दृष्टी तिच्यावर खिळली. तिचे डोळे तेजस्वी, काळेभोर होते. ते हत्यारी पोलीसही तिच्याकडे पाहू लागले. परंतु न्यायाधीश व ज्यूरीतील सभासद, यांना तिच्याकडे टक लावून बघायला लाज वाटली नाही. कारण ते सार्वजनिक सेवा करणारे जबाबदार लोक होते!
ज्युरींना कर्तव्यासंबंधी प्रवचन देण्यात आले.
‘तुम्ही न्याय करणारे. नि:पक्षपाती दृष्टीने पाहा. तुमची जबाबदारी मोठी आहे. तुम्ही सूज्ञ आहांत. ठीक.’
‘आरोपी नंबर एक, रामधन.’ पुकार झाला.
‘रामधन, उभा राहा.’ न्यायाधीश म्हणाले. तो उभा राहिला.
‘तू रामधन?’
‘होय.’
‘तुझा धंदा?’
‘शेतीचा. परंतु शेती परवडत नाही. म्हणून शहरात आलो. हॉटेलात नोकरी हा सध्याचा धंदा.’
‘तुझे वय?’
‘वय तेहतीस.’
‘विवाहित की अविवाहित?’
‘अविवाहित.’
‘पूर्वी कधी खटला तुझ्यावर झाला होता?’
‘नाही.’
‘तुझ्यावर जो आरोप करण्यात आला आहे तो तो तुला मान्य आहे? गुन्हा कबूल आहे?’
‘देवाशपथ मला काहीही माहीत नाही. आरोपपत्र मिळाले आहे, परंतु मी निरपराधी आहे.’
‘बसा खाली.’
तो बसेना. त्याला पुन्हा सांगण्यात आले. शेवटी शिपायाने त्याला ओढले तेव्हा तो बसला.
दुसरा आरोपी उभा राहिला. ती बाई होती. तिचे नाव रमी. तिचे त्रेचाळीस वर्षांचे वय होते. रामधन ज्या हॉटेलात नोकरीला होता, तिथेच तीही कामाला होती. तिच्यावरही यापूर्वी कधी खटला झालेला नव्हता.
आरोपपत्र तिला मिळाले होते. तिनेही गुन्हा ‘नाकबूल’ असे सांगितले.
आता तिसर्या आरोपीची विचारणा सुरू झाली.
तिसरा आरोपी म्हणजे रूपा.
‘तुझे नाव?’ सरकारी वकिलाने मृदू वाणीने विचारले.
‘रूपा.’
‘उभे राहून सांगायला हवे. उभी राहा.’
ती हसली व उभी राहिली.