नवजीवन 5
रूपाची अशा या जीवनात अशी सात वर्षे गेली. ती आता २८ वर्षांची होती. परंतु काही तरी भानगड झाली. तिच्यावर खटला भरण्यात आला होता. तिची तुरूंगात रवानगी करण्यात आली होती. तिच्या खटल्याचा आज निकाल होता. म्हणून तिला कोर्टाकडे नेण्यात येत होते. खिन्नपणे, गंभीरपणे ती जात होती.
तिकडे रूपाला हत्यारी पोलीस नेत होते, आणि इकडे प्रताप मऊमऊ गाद्यांवर लोळत होता. किती सुंदर तो पलंग! आणि त्या परांच्या गाद्या; नि वरची दुधाच्या फेसाप्रमाणे स्वच्छ अशी चादर! लोकरीच्या शाली! प्रतापला अजून उठावेसे वाटत नव्हते. परंतु शेवटी तो उठला. सुगंधी सिगारेट शिलगवून तो ती ओढीत बसला. दिवसा काय काय कामे आहेत ते तो मनात आठवू लागला. त्याला आदल्या दिवशीच्या सायंकाळची आठवण झाली. तो एका श्रीमंत घरी गेला होता. तेथील तरूणीशी तो लग्न करील असा अनेकांचा तर्क होता. ते सारे आठवताच तो खोलीमध्ये हिंडू फिरू लागला. त्या तरूणीशी लग्न करण्याचा विचार त्याला रूचला नाही. शयनागारातून तो बाहेर आला. सुंदर ब्रशाने उत्कृष्ट दंतमलम घेऊन दात कुंचलू लागला. तोंड धुऊन झाल्यावर सुगंधी साबण अंगाला लावून त्याने स्नान केले. त्याचे शरीर पीळदार होते. त्याला त्याचा अभिमान वाटत असावा. त्याने नवे कपडे घातले. त्याच्या घरातील प्रत्येक वस्तू उत्कृष्ट होती. उत्तम असेल तेच विकत घेई. साबण, ब्रश, बटणे, कपडे, बूट सारे सर्वोत्तम होते. कपडे करून तो टेबलाजवळ गेला. तो टपाल पाहू लागला. मोलकरणीने ते तेथे आणून ठेवले होते. त्याच्या आईची ती जुनी मोलकरीण. आई नुकतीच देवाघरी गेली होती. मोलकरीण आता घरातील सारे करी. स्वयंपाक करी. घरातील सारे पाही. लहानपणापासून त्याच घरात ती कामाला होती. घरातीलाच जणू ती झाली होती. तो टपाल बघत होता. इतक्यात ती मोलकरीण तेथे येऊन म्हणाली,
‘काल ज्या घरी तुम्ही गेला होतात, तेथून हे पत्र आले आहे. त्या मुलीचे किंवा तिच्या आईचे असावे. नोकर येऊन देऊन गेला.’ ती मोलकरीण गेली. त्याने ते पत्र फोडले. त्या मुलीच्या आईने मोठया ममतेचा आव आणून ते पत्र लिहिले होते.
‘प्रिय प्रताप,
अरे, तुला आज ज्यूरीत काम करायला जायचे आहे. तू विसरशील म्हणून सकाळी उठताच ही चिठ्ठी पाठवत आहे. तू काल आमच्याकडे यायचे कबूल केले होतेस. वेडया, तुला या सरकारी कामाची आठवणच नव्हती. कोर्टात वेळेवर जा. नाही तर दंड होईल. ध्यानात ठेव.