नवजीवन 57
‘तुम्ही लौकर बर्या व्हा. सुटलात, आईला भेटलात बरे झाले. सुखी असा. मी जातो.’ तो म्हणाला.
‘मी तुमची ऋणी आहे.’ माता म्हणाली.
‘तुमची मुलगी समाजांत न्याय यावा, समता यावी म्हणून धडपडत आहे. समाजाने तुमचे ऋणी असायला हवे. अशा तेजस्वी, त्यागी मुलीला तुम्ही जन्म दिलात. आई, तुम्ही धन्य आहांत!’
असे म्हणून तो निघाला. वाटेत तो लष्करी मित्र त्याला परत भेटला.
‘अरे, तू रात्री गाण्याला येशील का? ती प्रख्यात नटी आज गाणार आहे. ती जशी मोठी अभिनयसम्राज्ञी आहे, तशीच उत्कृष्ट गाणारीही आहे.’
‘मी नाही येणार.’
‘तू असा अरसिक कसा? कलांना उत्तेजन देणे म्हणजे संस्कृती आणि संस्कृती नसेल, तर मानवी जीवनाला अर्थ काय?’
‘मी गर्दीत आहे, जातो.’ असे म्हणून मित्राच्या हातांतून आपला हात सोडवून प्रताप विचार करीत वेगाने निघून गेला.
तो विचार करीत जात होता. संस्कृती म्हणजे काय? कला म्हणजे काय? विलास, सुखभोग, माकडचेष्टा, पशुता, म्हणजे का जीवनातील कला नी काव्य? जीवनात जे खरोखर महत्वाचे, त्याला हे प्रतिष्ठित लोक त्याज्य समजतात; जे जे मोलाचे ते ते त्यांना भिकार वाटते. यांच्या या संस्कृतीच्या झगमगाटाखाली, अन्याय, जुलूम, विषमता, विलास, ऐषआराम.- थोडक्यात म्हणजे सर्व प्रकारच्या घाणीचे मढे दडवलेले असते.
तो आपल्या खोलीत गेला. परंतु त्या बॅरिस्टराकडे जाऊन रूपाच्या अर्जाचे काय झाले ते विचारून यावे असे मनात येऊन तो पुन्हा बाहेर पडला. ते बॅरिस्टर बाहेर जाण्याच्या गडबडीत होते.
‘मी तुम्हांला कळवणारच होतो. अर्ज फेटाळला गेला. हे मोठमोठे कायदेपंडितही वरवरच्या गोष्टी बघतात. एका वेश्येचा अर्ज म्हणूनच आधी काहींनी कपाळास आठया घातल्या. न्यायमूर्तींच्या त्या समितीत शिक्षा कायमच झाली. मी करणे शक्य होते ते सारे केले.’
‘आता पुढे?’
‘राजाकडे अर्ज करा.’
‘वाईट झाले. ती निरपराधी होती.’
‘तुम्ही कोणा तरी बडया माणसाकडून गव्हर्नरसाहेबांकडे, लाटसाहबांकडे वशिला लावा.’
‘जे शक्य ते करीन. तुमची फी?’
‘कारकून सांगतील. घाई नाही.’
बॅरिस्टर निघून गेले. प्रतापने वर जाऊन कारकुनाजवळ पैसे दिले. प्रताप दु:खीकष्टी झाला होता. आता एकच मार्ग मोकळा होता. निराशेतील एकच आशा आता होती. बादशहांकडे दयेचा अर्ज करायचा. परंतु अर्जाचे उत्तर येण्यापूर्वीच रूपा इतर कैद्यांबरोबर काळया पाण्यावर पाठवली गेली असती. तो तिच्याबरोबर जायला मनाने तयार झाला होता. जमिनीची अजून नीट व्यवस्था लावायची होती. एके ठिकाणची जमीन कुळांनाच दिली होती. त्यांनी खंड द्यावा, परंतु तो गावच्या सुधारणेसाठी, गावच्या कल्याणासाठीच खर्च केला जावा, अशी त्याने व्यवस्था केली होती. ते सारे कायदेशीर अजून करायचे होते. दुसर्या ठिकाणच्या जमिनीचा खंड अजून ठरवायचा होता.