नवजीवन 73
प्रताप आता किसनजवळ बोलत बसला. किसन आपल्या पत्नीचे सारे वृत्त सांगत होता. ती कशी क्षणभर वेडयाप्रमाणे वागली. तिला तुरुंगातून कशी सोडवून आणली. परंतु पुन्हा सुखाने संसार करू लागलो तो पोलिसांनी तिला नेले आणि आता काळया पाण्याची शिक्षा!
‘तुमची बायको, तिच्या मनांत खरे थोडेच असेल तुम्हांला ठार करायचे? तसे कोणाच्याच मनात नसते. जिवंत प्राण्याला जिवे मारायचे कोण कशाला मनांत आणील! आमच्या गावी एक माळी होता-’ अशी गोष्ट एक शेतकरी सुरू करणार तो स्टेशन आले. गोष्ट तशीच राहिली. प्रताप थोडा वेळ स्टेशनवर उतरला. कोणी बडी माणसे चढत होती. त्यांनी आपल्याला ओळखू नये म्हणून प्रताप जपत होता. गाडीची वेळ झाली. तो पुन्हा डब्यात चढला. डब्यातील कोणी उतरले होते, कोणी नवीन चढले होते. हा कोण एक आहे? तो जंगलातून घरी जात होता.
‘इतके काम केले. परंतु जातांना दहा रूपयेही जवळ नाहीत. पाचसहा महिने जंगलात काम करीत होते. काँट्रॅक्टर काताचा धंदा करी. आम्ही लाकडे तोडावी. बारीक करावी. भट्टी लागायची. जंगलांत आम्हांला प्यायला नीट पाणीही नसे. हिवताप लागे. काँट्रॅक्टर जंगलांतले ते विषारी पाणी पीत नसे. त्याच्यासाठी सोडावॉटरच्या बाटल्या असत. परंतु आम्ही तेच डबक्यातील पाणी प्यायचे. एकजण जंगलातच मेला. काय करायचे? आता चार महिने काम बंद. पावसाळा आला. जंगलात लौकर सुरू होतो. दसरा दिवाळीनंतर परत जायचे.’ तो हाडकुळा मनुष्य स्वत:ची कहाणी सांगत होता.
त्याने खिशातून सुपारी काढली. त्याने प्रतापला दिली. प्रतापने नाकारली नाही. ती निष्पाप जीवने, त्या श्रमजीवींच्या कथा त्याला निराळयाच जगाचे दर्शन घडवीत होत्या. प्रतापविषयी डब्यातील लोकांना आपलेपणा वाटला. त्याचा पोषाख नीटनेटका, जरा श्रीमंती होता तरी त्याच्या मनमोकळया निगर्वी वृत्तीमुळे तो आपल्यातीलच एक, असे त्या श्रमजीवींना वाटले. एकाने तर आपली हकीगत सांगतांना प्रतापच्या मांडीवर थाप मारून ‘दादा, ती गोष्ट अशी’ असे म्हणून आरंभ केला.
प्रताप मनात म्हणाला, ‘हे निराळेच जग आहे. हे धट्टेकट्टे लोक, हे साधे कपडे, ह्या घोंगडया, उन्हातान्हांत काम केलेले ते चेहरे, थकलेले परंतु प्रेमळ नि सहृदय. त्या श्रमजीवनांतील सुखदु:खे, हे खरे अकृत्रिम जीवन, जीवनमरणाचे खरेखुरे प्रश्न कसे हे जग-नाहीतर ते कृत्रिम श्रीमंत जीवन, ती खोटी प्रेमे, तो दंभ, तो आळशी विलास, त्या मेजवान्या, कलांवरचे ते वरपांगी वादविवाद, ते जग किती क्षुद्र नि निष्प्राण!’