नवजीवन 41
रात्री शांतपणे तो झोपला. सकाळी उठून थोडी न्याहारी करून तो जेलरखान्यावर गेला. जेलरची व त्याची आता चांगली ओळख झाली होती. हा कोणी तरी मोठा आहे असे शिपायांसही आता कळून चुकले होते.
‘त्या म्हातारीला नि तिच्या मुलाला आधी भेटून घेतो.’ प्रताप म्हणाला.
‘त्यांना घेऊन जा रे, बारा कोठयात. तो आग लावणारा पोरगा आहे ना, त्याची त्यांना भेट घेऊ दे. हे पाहा प्रतापराव, पोरगा सारे सांगेल. म्हातारीला भेटण्याची काय जरूर?’
‘बरे बरे.’
एका शिपायाबरोबर प्रताप बारा कोठयात गेला. तरूण तेथे होता. त्याने सारी हकीगत सांगितली.
‘आमच्या गावांत एक खानावळवाला आहे. त्याचा माझ्या बायकोवर डोळा. त्याने तिला फूस लावून नेले. मला कोठे न्याय मिळेना. तो खानावळवाला गावच्या पाटलास, पोलिसांस लाच देई. माझी दाद लागेना. मी त्या खानावळवाल्याकडे जाऊन बायकोस आणले. परंतु ती पुन्हा गेली. मी पुन्हा मागायला गेलो. तो म्हणाला, ‘माझ्या घरात ती नाही.’ ती घरात होती. मला नक्की माहीत होते. ‘माझी बायको टाक.’ असे म्हणून मी धरणे धरून बसलो. त्या खानावळवाल्याने नि त्याच्या नोकरांनी रक्तबंबाळ होईतो मला मारले. दुसर्या दिवशी त्या खानावळीस आग लागली. तिचा त्याने माझ्यावर आळ घेतला. त्याने घराचा विमा उतरून ठेवला होता. मी त्या खानावळवाल्यास एकदा देणार होतो तडाखे, परंतु आग लावण्याचे स्वप्नातही माझ्या मनांत नव्हते. आमच्यावर आरोप लादण्यात आला. आई नि मी दोघांवरील गुन्हा शाबीत करण्यांत आला. येथे आता मरत पडलो आहोत.’
‘तू खरेच नाही आग लावलीस?’
‘नाही. देवासाक्षी नाही.’ असे म्हणून त्या तरूणाने त्याच्या पायांवर डोके ठेवले. तो रडू लागला. प्रतापने त्याचे अश्रू पुसले नि सांगितले; ‘रडू नकोस. मी शक्य ते सारे करीन.’
इतक्यात त्याला दुसर्या कैद्यांनी हाक मारली.
‘महाराज, आमच्यावरही दया करा. आम्हांला येथे उगीच अडकवून ठेवण्यात आले आहे. आम्हांला बेकार म्हणून पकडण्यात आले. आम्ही उत्तर हिंदुस्थानांतून आलो. अजून धंदा मिळाला नव्हता, तर येथे आणून ठेवले. आमच्या मुलखातल्या तुरूंगात तरी पाठवा म्हटले तर तिकडे तुरूंग भरलेले आहोत, इकडेच ठेवा असे म्हणे लिहून आले आहे. येथे सडत पडलो आहोत. सरकारने उद्योग द्यावा. बेकार का कोणी आपण होऊन राहतो?’
‘पुरे करा रे तुमची कटकट.’ पोलीस म्हणाला.
‘आम्ही काय चोरीमारी केली आहे? म्हणे पुरे करा. काय म्हणून गप्प बसू?’
प्रतापने त्यांना आश्वासन दिले. तो परत फिरला.
‘रावसाहेब, हे लोक सारेच चांगले नसतात. कांही बंडखोर असतात. तुरूंगात फितुरी करतात. परवा शिक्षा करावी लागली, दोघांना फटक्यांची.’