नवजीवन 24
तो तेथे मनाला विरंगुळा मिळेल या आशेने आला होता. परंतु त्याला तेथे सारे विद्रूप दिसू लागले. तेथे सुखलोलुपता, स्वार्थ यांची घाण होती. त्याला तिटकारा वाटला. त्याने तिच्याकडे पाहिले. पूर्वी ती त्याला अव्यंग दिसे, निर्दोष सौंदर्याची मूर्ती वाटे. चांदण्यात सारे सुंदर दिसते. परंतु एकदम सूर्यप्रकाश आल्यावर सारे दोष, सार्या उणीवा दिसू लागतात. आज त्याचे तसे झाले होते. आज ती त्याला सुंदर दिसली नाही. तिच्या तोंडावर त्याला थोडया सुरकुत्याही दिसल्या. बोटांची नखे वाढलेली दिसली. ती तरूणी त्याच्याजवळ काहीतरी बोलू इच्छीत होती.
‘टेनीस खेळणे चांगले की नाही हो? मघा आमचा वाद चालला होता.’ तिने विचारले.
‘मी त्याचा कधी विचारच केला नाही.’ तो म्हणाला.
‘तुम्ही आईकडे येता?’ तिने सूचक विचारले.
‘येतो. ने मला.’ तो म्हणाला.
ती त्याला आईकडे नेत होती. जाताना परिचयात्मक स्वरात ती म्हणाली,
‘प्रताप, आज तुला काही तरी होत आहे. मला सांग.’
‘काही तरी होत आहे ही गोष्ट खरी.’ तो म्हणाला.
‘मग मला नाही सांगत. कृपा करून आज काही विचारू नकोस.’
‘नाही ना सांगत? नाही? बरं बरं.’ ती रागावून रूसून बोलली.
‘आज ते सारे सांगण्यासारखे नाही. मला अद्याप त्या सार्या प्रकरणावर विचार करायचा आहे.’
ती दोघे आईच्या प्रशस्त खोलीत आली. त्या तरूणीची आई तेथे एका डॉक्टराजवळ बसली होती. प्रतापला तिटकारा आला. आईने मुलीला जायला सांगितले.
‘जाताना मला भेटल्याशिवाय नका हं जाऊ.’ ती प्रतापला लाडिकपणाने, प्रेमाच्या हक्काने जणू बोलली.
‘कोर्टातून आलास प्रताप? कंटाळलास ना?’ मातेने विचारले.
‘हो.’ तो म्हणाला.
‘तुझे ते चित्र झाले का रे पुरे?’
‘मी अलीकडे चित्रकलेचा नाद सोडून दिला आहे.’
‘का? अरे, तुला कलेची देणगी आहे. कोणी बरे मला सांगितले की तू उत्कृष्ट कलावंत होशील म्हणून? आठवत नाही. एकूण तू चित्रकला सोडून दिलीस? अरे, कलेशिवाय जीवनात काय राम?’
ही माता थाप मारीत आहे हे प्रतापने ओळखले. कोणीही तीला काहीही सांगितले नव्हते. ती खोटे बोलत होती. प्रतापची वृत्ती आज ठीक नाही असे पाहून ती आता डॉक्टरांकडे वळली.
‘मग डॉक्टर, सांगा ते नवीन नाटक कसे आहे ते, तुमचे मत स्पष्ट सांगा.’ जणू डॉक्टरांचे मत म्हणजे शेवटचे मत होते! ते डॉक्टर कलेवर बोलू लागले. नाटकातील कलेवर मग प्रवचन सुरू झाले. ती माता त्या नाटकाचे समर्थन करू लागली.