नवजीवन 48
प्रताप पुढे चालला. दोन मुले पळत पळत त्याच्या पाठोपाठ आली.
‘तुम्हांला कोठे जायचे?’
‘गावच्या टोकाला. ती म्हातारी राहाते ना, तिच्याकडे.’
‘ती चोरून ताडी विकणारी? ती हडळ?’
मुलांबरोबर जाण्यात त्याला आनंद होत होता. मुलांच्या संगतीत मोकळेपणा असतो. तीही खरे ते सांगत असतात. गावाची नाडी कळायला हवी असेल तर गावातील मुलांना सारे विचारा.
‘काय रे, तुमच्या गावात अगदी गरीब अशी कोण आहेत?’
‘तो धोंडू, आणि गोप्या; तसेच तो लखू, ती भागीही फार गरीब आहे.’
‘भागीपेक्षा ती म्हातारी विठी गरीब आहे. ती भीक मागते. अंगावर चिंधी.’
बोलत जाता जाता रूपाच्या मावशीचे घर आले. तो आंत गेला. ती मुले बाहेरच रस्त्यात उभी होती.
‘कोण पाहिजे तुम्हांला?’ म्हातारीने बाहेर येऊन विचारले.
‘तुमच्याजवळ थोडे बोलायचे आहे. मी तुमचा मालक. त्या मावश्यांचा भाचा.’
‘तो का तू? माझ्या राजा, मी ओळखलेच नाही हो! क्षमा कर दादा. तुम्ही मोठी माणसे. पूर्वी तुम्ही फुलासारखे दिसायचे. आता बरेच मोठे झालेत. मी तुम्हांला मावश्यांच्या घरी पाहिले आहे. आज तुमचा चेहरा काळवंडलेला दिसतो. चिंता आहे. काळजी वाटते जिवाला? जगांत कुठेही जा. सगळीकडे कटकटी आहेत.’
‘आजीबाई, तुम्हांला रूपा आठवते का?’
‘आठवते म्हणून काय विचारतोस? ती माझी भाची. तिच्यासाठी मी रडते आहे. तिची आठवण कशी जाईल? तिच्या आईच्या मागे मीच तिला प्रेम दिले आहे.’
‘ती माझ्या मावश्यांकडे असे.’
‘हो, मला सारे माहीत आहे. जाऊ दे. कोणाची चूक नाही. कोणाचे पाप नाही. आपलेपणात माणसे आली, वयात आली, म्हणजे असे होते. जवानी असते! सैतानाला फावते. खरे ना? तुम्ही तिला लाथही मारू शकले असते! परंतु तुम्ही शंभर रूपये तिला दिलेत. आणि ती? वेडी होती. माझे ऐकती तर नीट राहाती. मी तिला चांगला धनी मिळवून देत होते. परंतु तिने ऐकले नाही. वेडी पोर. आमच्यासारख्यांनी का थोरामोठयांना, धनीमाणसांना नावे ठेवावी? त्या मावश्यांनी तिला हाकलून दिले. पुढे जंगलच्या रेंजरकडे होती तिथेही टिकली नाही.’