Get it on Google Play
Download on the App Store

नवजीवन 70

‘हो.’

‘आमची गाडी आधी आहे. तुझ्या उलट दिशेने आम्हांला जायचे.’

‘आपले मार्गच उलट. ताई, काल मी जरा रागाने बोललो. तुझ्या पतीचे मन दुखावले गेले असेल. मी क्षमा करा म्हणून पत्रही लिहिले, परंतु खिशात राहिले. हे बघ’

त्याने तिच्या हातात ते पत्र दिले.

‘तू मनाचा आहेसच थोर.’ ती म्हणाली.

‘आणि हे बघ, आईचे घर आहे ना, ते तुझ्या नावाने मी ठेवले आहे. तसेच जी जमीन मी अजून कुळांना दिली नाही, ती मी मेलो म्हणजे तुझ्या मुलांची होईल.’

‘नको रे असे बोलू.’

‘त्या एका गावच्या जमिनीशिवाय बाकी सारे मी देऊन टाकले आहे. मी लग्न केले तरी मूलबाळ मला होणार नाही...’

‘प्रताप, तू रडवतोस हो मला.’

परंतु तिचा नवरा आला. त्यांच्या गाडीची वेळ झाली. पोर्टरने सामान उचलले.

‘अच्छा, तिचा पती म्हणाला.

‘राग नका धरू क्षमस्व.’ प्रताप म्हणाला.

‘तुझा स्वभाव मी जाणतो.’

‘आणि प्रताप, तिसर्‍या वर्गाने जाऊ नको. निदान दुसरा वर्ग तरी.’ बहीण म्हणाली.

‘तिसरा वर्गच बरा. तो किसनही मजबरोबर आहे. तिसर्‍या वर्गातील दुनियाच मला बघायची आहे. बाकी पाहून झाली.’

ती गेली. प्रताप तेथेच उभा होता. तो आणखी पुढे पोचवीत गेला नाही. बहिणीला घर, शेतीवाडी राहाणार असे ऐकून किती आनंद झाला, ते त्याने पाहिले होते. इतकी का ती संसारी बनली, असे त्याच्या मनात आले, कोठे आहे ती लहानपणीची बहीण? श्रमणार्‍यांचा आधी हक्क, असे माझ्याबरोबर म्हणणारी? ती का मुलाबाळांच्या सुखात रमली? पतीच्या संगतीत राहून तीही का संकुचित बनली? ही का जीवनाची फलश्रुती? हा का विकास? परंतु हे बडे लोक यालाच कृतार्थता मानतात. तो वेटिंग रूममधील एका खुर्चीत बसला. तो खिन्न नि उदास होता.

प्रताप आगगाडीत बसला. तिसर्‍या वर्गाचा तो डबा होता. सर्व प्रकारचे लोक त्यांत होते. कामगार, शेतकरी, रस्त्यावर खडी फोडणारे, नाना प्रकारचे लोक, प्रतापचे लक्ष नव्हते. त्या दोन मेलेल्या कैद्यांचाच विचार त्याच्या डोक्यात होता. हा खूनच नव्हे का? त्या दोन कैद्यांचा खूनच नाही का यांनी केला? आणि असे किती मारले जात असतील! परंतु याला जबाबदार कोण? जो तो आपला हुकूम बजावणारा. ज्याला त्याला आपल्या ऑफिसचे महत्त्व. मानवाला किंमत नाही! मानवासंबंधी आपले कर्तव्य आहे; या सर्व कायद्यांपेक्षा, वरिष्ठांच्या हुकुमापेक्षाही ते श्रेष्ठ आहे, असे यांना वाटतच नाही. मानवजातीविषयी क्षणभर जर प्रेम उद्भवले, सर्वांविषयी बंधुभाव वाटला तर बिनदिक्कतपणे अशी कृत्ये करायला मनुष्य तयार होणार नाही. मानवाविषयी प्रेम हाच सुधारणेचा उपाय!

नवजीवन

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
नवजीवन 1 नवजीवन 2 नवजीवन 3 नवजीवन 4 नवजीवन 5 नवजीवन 6 नवजीवन 7 नवजीवन 8 नवजीवन 9 नवजीवन 10 नवजीवन 11 नवजीवन 12 नवजीवन 13 नवजीवन 14 नवजीवन 15 नवजीवन 16 नवजीवन 17 नवजीवन 18 नवजीवन 19 नवजीवन 20 नवजीवन 21 नवजीवन 22 नवजीवन 23 नवजीवन 24 नवजीवन 25 नवजीवन 26 नवजीवन 27 नवजीवन 28 नवजीवन 29 नवजीवन 30 नवजीवन 31 नवजीवन 32 नवजीवन 33 नवजीवन 34 नवजीवन 35 नवजीवन 36 नवजीवन 37 नवजीवन 38 नवजीवन 39 नवजीवन 40 नवजीवन 41 नवजीवन 42 नवजीवन 43 नवजीवन 44 नवजीवन 45 नवजीवन 46 नवजीवन 47 नवजीवन 48 नवजीवन 49 नवजीवन 50 नवजीवन 51 नवजीवन 52 नवजीवन 53 नवजीवन 54 नवजीवन 55 नवजीवन 56 नवजीवन 57 नवजीवन 58 नवजीवन 59 नवजीवन 60 नवजीवन 61 नवजीवन 62 नवजीवन 63 नवजीवन 64 नवजीवन 65 नवजीवन 66 नवजीवन 67 नवजीवन 68 नवजीवन 69 नवजीवन 70 नवजीवन 71 नवजीवन 72 नवजीवन 73 नवजीवन 74 नवजीवन 75 नवजीवन 76 नवजीवन 77 नवजीवन 78 नवजीवन 79 नवजीवन 80 नवजीवन 81 नवजीवन 82 नवजीवन 83 नवजीवन 84 नवजीवन 85