नवजीवन 29
‘बेकारांना जर सरकार काम देईल तर चोर कशाला होतील? बेकारांना धंदा द्या. त्या तरूणाने चार चटया चोरल्या. त्याला खायला नसेल. तुम्हा आम्हासही जर खायला मिळाले नाही तर तुम्ही आम्हीही चोर्या करू. चटयांच्याच नाही तर मोठमोठया करू. बिचारा तरूण! तीन वर्षे तुरूंगात तो खितपत पडणार! आणि जिनगर, तो मेलाही. बरेच दिवस खटला चालला असेल. त्या कोठडीत तो आजारी पडला असेल. महाराज, तो तरूण समाजाला धोका देणारा की त्या तरूणाला अशी शिक्षा देणारे आपण अधिक धोकेबाज?’
‘जाऊ द्या. तुम्ही उदारमतवादी दिसता. तुम्हांला भेटीची परवानगी हवी आहे. होय ना?’
‘होय. ती स्त्री निरपराधी आहे. मी तिच्याशी लग्नही करीन.’
‘तुम्ही बडे जमीनदार ना?’
‘जमीनदारांचेही पाप मी दूर करणार आहे. आणि मी जमीनदार असलो म्हणून काय झाले?’
‘तसे माझे काही म्हणणे नाही. पसंत पडेल तेथे लग्न करावे.’
‘परवानगी देता?
‘बसा देतो!’
त्याने चिठ्ठी लिहिली.
‘मला आणखीही एक सांगायचे आहे. यापुढे ज्यूरीत मी राहू इच्छित नाही. कोणी कोणाचा न्याय करावा? आपण सारेच अन्यायी असतो. मी तरी आहे. आपण निष्पाप आहोत, आपल्या हातून अन्याय घडला नाही असे ज्याला वाटत असेल त्याने दुसर्याचा न्याय करावा.’
‘तुम्ही अर्ज द्या. तुमची कारणे लिहा. ती कारणे सरकारला पटली तर तुमचे नाव काढून टाकण्यात येईल. न पटली आणि तुम्ही न आलात तर तुम्हांला दंड होईल, समजले ना?’
‘मी अर्जबिर्ज करणार नाही. तुमच्या कानांवर गोष्ट घातली आहे.’
‘ठीक तर. आणखी आहे काही काम?’
‘आज तरी नाही. येतो. आभारी आहे.’
प्रतापराव निघून गेला. त्या अधिकार्याची पत्नी बाहेर येऊन म्हणाली,
‘कोण आला होता हो?’
‘अग, तो आबासाहेबांचा प्रतापराव. विक्षिप्त आहे. वाटेल ते बोलत होता. म्हणे त्या कैदी बाईशी मी लग्न लावणार आहे. म्हणे मीच तिला भुलवले!’
‘खरे की काय?’
‘म्हणत तरी होता. आजच्या तरूणांत काही तरी विकृतीच आहे. त्यांना प्रतिष्ठा नाही, कुलाभिमान नाही. वाटेल तेथे लग्ने करतील. श्रीमंतांची मुले क्रान्तिकारक होतात. फाशी जातात. काही तरी विकृती जडली आहे या नवतरूणांना.’
‘परंतु हा प्रतापराव काही तितका तरूण नाही आता. तुम्ही त्याला जाऊ का दिलेत? मीही त्याची विकृती पाहिली असती. पुन्हा आला तर त्याला भेटेन. ध्यानात ठेवा. नाही तर विसराल.’
‘अग, अशांना भेटून काय उपयोग? या लोकांना काहीतरी बंधन घातले पाहिजे. सरकारी कामात पदोपदी अडथळे आणतील. समाजातही बखेडे माजवतील. या लोकांचा धोका वाटतो. फार भयंकर असतात हे प्राणी.’
‘हे भयंकर प्राणीही कधी कधी गोगलगाय होतात. आता हाच बघा. ज्याची तुम्हांला भीती वाटते, तो धोकेबाज वाटतो, तो त्या कैदी बाईशी लग्न करायला तयार होता. खरे ना? मला भेटायचे आहे या प्रतापरावाला. चला, आपल्याला जायचे आहे ना एके ठिकाणी? उठा.’