नवजीवन 66
‘रूपा, सामान पाठवलेले मिळाले?’ प्रतापने विचारले.
‘हो.’ ती म्हणाली.
इतक्यात एक अंमलदार तेथे आला. ‘अहो, बोलणे कायद्याविरुध्द आहे. दूर व्हा. आमच्यावर जबाबदारी असते.’ परंतु थोडया वेळाने प्रतापला त्या अंमलदाराने ओळखले. नम्रपणाने तो म्हणाला, ‘एकदा स्टेशनवर पोचू दे, मग तेथे थोडे बोला.’
‘चलो!’ हुकूम झाला.
आणि ते शेकडो कैदी निघाले. खळखळ आवाज होत होते. कोणाची पावले मोठया कष्टाने पडत होती. ‘पाव उठाव, पाव उठाव’ पोलीस ओरडत होते. पाय चटपट भाजत होते. ते रस्ते आगीसारखे होते. कोणाला तहान लागली. परंतु वाटेत पाणी कोण देणार?
ती एका घोडयाची गाडी येत आहे ती कोणाची?
रस्ता कैद्यांनी भरून गेला होता. गाडी थांबली. गाडीत एक श्रीमंत मनुष्य होता. त्याची दोन मुले गाडीत होती.
‘गाडी थांबवा.’ पोलीस म्हणाले.
‘गाडीला जागा द्या.’ गाडीवान म्हणाला.
आत कोणी बडा माणूस आहे असे गाडीच्या थाटावरून वाटत होते. पोलीस विनयाने म्हणाला, ‘त्या कोपर्यावर आम्ही वळू. तोवर हळूहळू हाका गाडी.’
मुलांनी गाडीतून बाहेर पाहिले. मुलीने विचारले, ‘आई, कोण हे लोक? यांना कोठे नेत आहेत? परंतु आईबापांची कठोर मुद्रा पाहून ती गप्प बसली. हे निराळयाच जातीचे प्राणी असावेत असा तिने तर्क केला. परंतु तिचा तो भाऊ! तो करूणेने बाहेर बघत होता. त्याचे काळेभोर निर्मळ, निष्पाप डोळे त्या दोन मानवजातीकडे बघत होते. आपल्या सारखेच हे प्राणी. परंतु कोणीतरी त्यांना छळीत आहे असे त्याला वाटले. तो वेडावाकडा पोषाख, सर्वांचे मुंडन केलेले, त्या श्रृंखला! त्या मुलाला वाईट वाटले. रडू येऊ नये म्हणून तो ओठ चावीत होता.
प्रताप पायीच त्या कैद्यांच्या पाठोपाठ जात होता. परंतु तो दमला. त्याने एक गाडी केली. गाडी हळूहळू जात होती. त्याने थंड पेय घेतले. गाडीत बसून तो निघाला. कैदी बरेच दूर गेले होते. परंतु रस्त्यात कसली गर्दी! हा एक कैदी रस्त्यात उष्णतेचा प्रहार होऊन पडला वाटते! तोंड लाललाल आहे. डोळे रक्ताळ आहेत. तो कण्हत होता. एक पोलीस तेथे उभा होता.