नवजीवन 37
‘शंभर?’
‘हो.’
त्याने खिशातून नोट काढून दिली. आणि तो निघून गेला.
प्रतापराव त्यानंतर एका बडया अधिकार्याला भेटला. रूपाला वाटेल तेव्हा स्वतंत्र भेटण्याची त्याने परवानगी मिळवली. एके दिवशी सकाळी तो पुन्हा रूपाला भेटायला आला. कचेरीत जेलर नव्हता. त्याने चौकशी केली.
‘बसा तुम्ही, साहेब महत्त्वाच्या कामात आहेत. ते आले म्हणजे भेट देतील.’ तेथील कारकून म्हणाला.
जेलरसाहेब कोणत्या महत्त्वाच्या कामांत होते? एका कैद्याने अंधार कोठडीत शिरण्याचे नाकारले. माझा काय अपराध, असे त्याने विचारले. इतरही कैदी बंद होत. शेवटी अधिक पोलीस आले. लाठीमार करून त्या सर्वांना बंद करण्यात आले. ज्या कैद्याने प्रथम बंड पुकारले त्याच्यावर तुरूंगात फितुरी करण्याचा आरोप ठेवून फटक्याची शिक्षा सुनावण्यात आली. ते फटके आज सकाळी देण्यांत यायचे होते. त्याला ओढून नेण्यांत आले. तिकाटण्यात बांधण्यात आले. त्याला वेत मारण्यांत आले. साहेब त्या महत्त्वाच्या कामात होते. ते आले ते हुश्श करीत आले.
‘याद राहील चांगली.’ कचेरीत येऊन तो म्हणाला. प्रतापने नमस्कार केला.
‘तुम्ही आलात? या बसा, तुम्हांला परवानगी मिळाली आहे. कोण आहे तिकडे? त्या रूपाला आणा. म्हणावे भेट आहे. तुम्ही केव्हा आलात? अहो, आमच्यावर मोठी जबाबदारी असते. तुरूंग चालवणे कठीण.’
‘तुम्ही थकल्यासारखे, त्रस्त झाल्यागत दिसता?’
‘ही नोकरीच नको वाटते. आमची कर्तव्ये कठोर असतात. आम्ही या कैद्यांची स्थिती सुधारू बघतो. परंतु हे अधिकच वाईट वागू लागतात, काय करायचे? कसे सुटायचे, मुक्त व्हायचे कळत नाही.’
‘तुम्ही नोकरी का नाही सोडून देत?’
‘कुटुंब आहे ना? सर्वांना पोसू कसे?
‘येथील नोकरी जर इतकी कठीण असेल तर ती सोडून दुसरीकडे बघा.’
‘येथल्या नोकरीतही थोडे समाधान आहे. हे कैदी तरी माणसेच ना? त्यांच्या उपयोगी पडता येते. माझ्या जागी दुसरा कोणी असता तर यांचे हाल करता. मी किती जमवून घेतो, जपून वागतो. या कैद्यांची कीव येते, दया येते. हे कधी कधी आपसांत मारामारी करतात. परवा एकजण ठार झाला. ही पाहा आलीच रूपा.’ रूपा आली. जवळच्या स्टुलावर ती बसली.
प्रतापने अपिलाचा अर्ज आणला होता. शिक्षा कमी व्हावी म्हणून अर्ज. जेलरच्या परवानगीने त्याने तिच्याजवळ तो सहीसाठी दिला.
‘सही करता येते का? लिहिता वाचता येते का?’ त्या जेलरने तिला विचारले.
‘एके काळी येत होते.’ ती म्हणाली.
तिने सही करून तो अर्ज त्याच्याजवळ दिला.