नवजीवन 64
‘सत्य तुम्ही म्हणता त्याच्या अगदी उलट आहे. जेव्हा जमीन कोणा एकाच्या मालकीची म्हणून राहणार नाही तेव्हाच ती पडून राहणार नाही. आज जमिनी ठायी ठायी पडून आहेत. जमीनदार स्वत: लागवडीस आणीत नाहीत, दुसर्यांना लागवडीस आणू देत नाहीत.’
‘प्रताप, तुझे म्हणणे सारे वेडेपणाचे आहे. जमिनीवरील मालकी हक्क अजिबात नाहीसा करणे या युगात शक्य आहे? लहानपणापासून तुझे हे वेड आहे. परंतु प्रत्यक्ष काही कृती करण्यापूर्वी नीट विचार कर.’
‘म्हणजे माझ्या व्यक्तिगत कारभारासंबंधी का तुमचे बोलणे आहे?’
‘होय. वडिलोपार्जित जी मालमत्ता मिळाली. ती आपण नीट सांभाळून पुढील पिढीच्या हाती दिली पाहिजे.’
‘परंतु मला कर्तव्य वाटते की...’
‘मी माझ्या किंवा माझ्या मुलांच्या स्वार्थासाठी हे बोलत नाही. माझ्या मुलाबाळांना काही कमी पडणार नाही. देवाच्या कृपेने मला भरपूर मिळत आहे. मी तुझ्या इस्टेटसंबंधी जे बोलत आहे ते तत्वनिष्ठेमुळे. तुम्ही ते एक पुस्तक वाचले आहे?’
‘काय वाचायचे आणि काय वाचायचे नाही, ते माझे मी पाहीन!’ असे म्हणून प्रताप चहा पिऊ लागला. त्याने विषय बदलला.
‘तुझी मुलेबाळे कशी आहेत?’ त्याने बहिणीला विचारले.
‘आनंदी आहेत. अरे, लहानपणी तू तीन बाहुल्या घेऊन खेळायचास, अघदी तशी खेळतात बघ.’
‘तुला लहानपणाचे अजून आठवते?’
‘सारे आठवते.’
इतक्यात पुन्हा वर्तमानपत्रातील एका खटल्यावरून गोष्टी निघाल्या आणि प्रताप म्हणाला.
‘कायद्याचा हेतु न्याय देण्याचा कधीच नसतो.’
‘तर मग कायदा कशासाठी असतो?’
‘त्या त्या विशिष्ट वर्गाचे हितसंबंध पाळण्यासाठी कायदा असतो. जी परिस्थिती आहे तीच कायदा ठेवू इच्छितो. ज्यांच्या हातात जमिनी, कारखानदारी आहे, ती तशीच कायदा ठेवू इच्छितो.’
‘हे मी नवीनच ऐकतो आहे.’
‘नवीन असले तरी सत्य आहे. कायद्याला फरक करायची इच्छा नाही. आणि चांगल्या चांगल्या व्यक्तींचा कायद्याने छळ करतात, त्यांना फाशी देतात. सामान्य लोकांना कैदी म्हणून छळतात, असामान्य राजकीय कैद्यांना बंडखोर म्हणून छळतात.’
‘राजकीय कैदी असामान्य असतात असे मला वाटत नाही. पुष्कळदा समाजातील अत्यंत हीनपतित असे लोक असतात. त्यांच्या डोक्यांत काही तरी वेड भरवले जाते आणि अत्याचारास ते प्रवृत्त होतात.’
‘परंतु मला अशा व्यक्ती माहीत आहेत की ज्या नैतिकदृष्टया न्यायाधीशांपेक्षा शतपटींनी श्रेष्ठ होत्या!’
‘कायदा आहे तीच स्थिती राहावी असे नाही म्हणत. कायदा सुधारणा व्हावी म्हणून असतो.'