नवजीवन 20
तिने दार हळूच उघडले. त्याने तिला एकदम उचलले. ती नको नको म्हणत त्याला अधिकच बिलगत होती. त्याने तिला आपल्या खोलीत नेले! आणि पहाटे ती हळूच आपल्या खोलीत येऊन पडली. तो आपल्या खोलीत होता. प्रताप विचार करू लागला, ‘परंतु असे सर्वांच्याच बाबतीत होते. प्रत्येकजण असे करतो, असे न करणारा आमच्या लष्करी अधिकार्यांत कोण आहे?’ असे म्हणून निश्चिंतपणे तो झोपला! परंतु रूपाला झोप येत नव्हती. ‘ही सुखाची घटना की दु:खाची? याचे पर्यवसान काय होणार?’ याचा विचार करीत ती तळमळत होती. सकाळ झाली. रूपा उठली. आज तरी जरा खिन्न होती. गंभीर होती. दुसरा लष्करी तरूण, प्रतापचा मित्र तेथे उतरला. आज तिसरे प्रहरी दोघे जायचे होते. रूपाला त्या नव्या तरूणाने पाहिले. तो प्रतापला म्हणाला.
‘तू तेथे वाटेत का उतरलास हे आता समजले. योग्य तेच केलेस. मी असतो तर, असेच केले असते. भाग्यवान् आहेस तू. किती मोहक आहे ती!’
‘क्षणाची गंमत.’ प्रताप म्हणाला.
आणि मावश्यांचा निरोप घेऊन तो जायला निघाला. ती बाजूला उभी होती. तो तिच्याकडे वळला. ती खोलीत गेली. शंभराची नोट कोर्या पाकिटात घालून तो तिला म्हणाला,
‘घे. शंभराची नोट आहे आत.’
तिने त्याचा हात दु:खसंतापाने दूर लोटला.
‘घे. घेतली पाहिजे.’ असे म्हणून तिच्या हातात ती नोट कोंबून तो गेला. आपली काही तरी चुकले असे तिला वाटले. त्याला जरा चुकचुक वाटली. परंतु गाडीत बसल्यावर सिगारेटच्या धुरांत सारे विरून गेले!
हे सारे त्याला आज कोर्टात आठवले. तो बेचैन झाला. ज्यूरीच्या खोलीत तो त्यांच्यांत बसला. ते सारे निर्णय घेणार होते. दोषी निर्दोषी ठरवणार होते. परंतु प्रताप मनात म्हणाला. ‘मी कोणाचा न्याय करू माझाच न्याय व्हायची वेळ आली आहे.’ तो खटला चालला असताना शेकडो जुने प्रसंग आणि दुसर्या भेटीतील तो भोग प्रसंग. ती रात्र. आकाशातील चंद्राची शिंगे टोकदार दिसत होती. कृष्णपक्षातील एकादशीची कोर! ‘आज रूपाची काय दशा? ती आता दारू पिते? परंतु स्वस्थिति विसरण्यासाठी पीत असेल,’ ज्युरीतील लोक चर्चा करू लागले.
‘त्या व्यापार्याने खरे सुख अनुभवले. अशी सुंदरी भोगल्यावर पुन्हा जगावे कशाला?’ ज्यूरीतील एकजण म्हणाला.
‘ती सुशिक्षित दिसते. चांगल्या घराण्यातील असावी.’ दुसरा कोणी म्हणाला.
प्रताप काही बोलत नव्हता. त्याला हे सारे केव्हा आटपेल असे झाले होते. शिकार्याने घायाळ केलेल्या पक्षास पिशवीत भरलेले असावे; तो पक्षी आत तडफडत असतो. शिकार्याला दया येते. घरी केव्हा जाऊन याला लौकर मुक्त करू असे त्याला वाटते. तसे जणू प्रतापला होत होते. त्याची दया त्या प्रकारची होती.