नवजीवन 39
‘नाही, तुम्हांला असे वागता येणार नाही.’
‘रूपा!’
‘चालते व्हा येथून. मी एक कैदी आहे, वेश्या आहे. तुम्ही जमीनदार, प्रतिष्ठित, बडे लोक. येथे तुमचे काय काम आहे? कशाला मला पुन्हा पुन्हा बोलवता?’
‘ती रागाने थरथरत होती. तिने त्याच्या हातातून आपला हात ओढून घेतला. ती पुन्हा म्हणाली,
‘तुम्ही स्वत:चा उध्दार करू पाहता. माझ्यावर कृपा करून परलोकीच्या सुखाची सोय करून ठेवीत आहा. या जन्मी मला भोगून, पश्चातापाचे आता सोंग करून परलोकी मोक्ष मिळावा म्हणून तुमची खटपट दिसते! मोक्ष का इतका सोपा आहे? इहपरलोकी स्वत:च्या सुखापलीकडे तुम्हांला दुसरे काही दिसते का? चालते व्हा. तुमचा मला तिटकारा आला आहे. तुमच्या लठ्ठ देहाचा तिरस्कार वाटतो. चालते व्हा.’
ती मोठयाने बोलत होती. जेलरने तिच्याकडे पाहून, ‘हा काय आहे आरडाओरडा? तू कैदी आहेस, विसरू नकोस. असे मोठयाने नाही बोलता कामा.’ असे फर्माविले.
‘रूपा, माझ्यावर तुझा विश्वास नाही का?’
‘तुम्ही का माझ्याशी लग्न लावू इच्छिता?’
‘हो.’
‘नाही. ही गोष्ट कधीही घडणार नाही. मी गळयाला फास लावून मरेन. परंतु ही गोष्ट मी नाही होऊ देणार. समजले?’
‘तरीही मी तुझी सेवा करीत जाईन; तुझ्या हितमंगलाची काळजी वाहीन.’
‘ते तुमचे तुम्ही बघा. मला तर तुमच्यापासून कशाचीही अपेक्षा नाही. मला तुमचे काहीही नको. मी खरे ते साफ साफ सांगत आहे. खरेच, मीही माझे बाळ मेले त्याच वेळेस का नाही मेले?’ असे म्हणून ती रडू लागली. तिचे अश्रू पाहून त्याचेही डोळे ओले झाले. तिने अश्रूतून त्याच्याकडे पाहिले. जेलर म्हणाला, ‘वेळ संपला.’
‘रूपा, आज तू अशान्त आहेस, प्रक्षुब्ध झाली आहेस. मी शक्य तर परत येईन. तू पुन्हा विचार करून ठेव.’ शेवटी म्हणाला.
ती निघून गेली नि खोलीत खिन्नपणे बसून राहिली. सारे जीवन तिला आठवले. परंतु त्या स्मृती तिला असह्य होत होत्या. प्रतापही घरी जात होता. आपल्या हातून केवढे पाप घडले याची आज त्याला नीट कल्पना आली. आपल्या हातून केवढे पाप घडले याची आज त्याला नीट कल्पना आली. या स्त्रीच्या आत्म्याची आपण काय स्थिती केली हे आज त्याला कळून आले. आतापर्यंत त्याची समजूत होती की, आपण काही फार वाईट नाही. आपणास पश्चात्ताप झाला आहे. आपण तिच्या उपयोगी पडत आहोत. परंतु आज तो घाबरला. स्वत:च्या पापाचे स्वरूप पाहून त्याला अत्यंत वाईट वाटले. हे पाप कसे निस्तरायचे हे त्याला समजेना. शेवटी तो मनात म्हणाला, ‘तिचा त्याग करू शकत नाही. शक्य ते सारे तिच्यासाठी मी करीत राहीन.’ तो जात होता. इतक्यात जेलचा शिपाई धावत येऊन म्हणाला, ‘जेलरसाहेब तुम्हांला बोलावीत आहेत.’ तो परत आला.