पुनर्रचना 25
जागतिक ऐक्याचे दोन मार्ग आहेत; जागतिक सत्ता किंवा जागतिक राष्ट्रसंघ. एकाचीच सत्ता सर्व जगावर होणे हे अशक्य आहे. कारण राष्ट्रवाद हा नेहमी आडवा येणार. तसे करु पाहणे म्हणजे रक्तमांसाच्या चिखलातून सदैव जाणे होय. अशा मारणमरणाच्या लढायांत मानवजातच कदाचित नष्ट व्हायची, जगाचाच अंत व्हायचा. एखाद्या मानववंशाची सर्वश्रेष्ठता सिद्ध व्हावी म्हणून बाकी या जगाचा का बरे नाश व्हावा ? आजकालची युद्धेही महाग होत आहेत. भीषण होत आहेत. कोणत्याही एका साम्राज्यात इतर सर्व जग पादाक्रांत करण्याची शक्ती नाही आणि ईश्वराने का मानवजात एकाच ठशाची निर्मिली आहे ? नाना जातीजमातींची व नाना वंशाची, नाना राष्ट्रे त्याने निर्मिली आहेत. जागतिक ऐक्याचा दुसरा एक सुकर मार्ग आहे: आपण आपल्या राष्ट्रवादास थोडी मुरड घालून उच्चतर अशा एकीकरणाचा, आंतरराष्ट्रीय सहकार्याचा प्रयत्न करु शकू. आशिया युरोपचे यशस्वी अनुकरण करु लागला, आपली आर्थिक पिळवणूक बंद करु लागला, दुस-यांची सत्ता रोखू लागला तर युरोपच्या सुस्थितीला धोका आहे, असे म्हणणे म्हणजे मोठे चमत्कारिक व विचित्र तर्कशास्त्र होय. आमचा देशाभिमान दैवी, इतरांचा मात्र आसुरी! आजच्या चालू असलेल्या आर्थिक शोषणाला जर कोणत्या देशाने विरोध केला तर संकट आले, असे आम्ही ओरडू लागतो! काही राष्ट्रांना गुलाम ठेवून जगात शांती नांदवू पाहाल तर ते शक्य नाही. सर्वांच्या स्वातंत्र्यातच जगाचे रक्षण आहे. आंतरराष्ट्रीय सहकार्य होण्यासाठी प्रत्येक राष्ट्र आधी स्वतंत्र होणे आवश्यक आहे; त्याशिवाय सारे फोल आहे. प्रत्येक राष्ट्राच्या विशिष्टत्वाला मान दिला पाहिजे. प्रत्येकाची अपूर्वता मान्य केली पाहिजे. सर्व राष्ट्रांना आम्ही स्वातंत्र्य देऊ अशा प्रकारचे ध्येय व अशा प्रकारचा प्रयत्न सर्व जगाचा असला पाहिजे. जगातील काही भाग इतरांपेक्षा मागसलेले असतील; परंतु ‘त्यांचा दुबळेपणा म्हणजे आमची संधी’ असे नाही होता कामा. एखाद्या मनुष्याने दुबळ्या शेजा-याला दरडावणे किंवा त्याच्या दुबळेपणाचा फायदा घेणे हे जितके वाईट, तितकेच एखाद्या प्रबळ राष्ट्राने दुस-या दुबळ्या राष्ट्राला घशात पाहणेही वाईट असेच सर्व प्रामाणिक माणसे म्हणतील. व्यक्तींप्रमाणे राष्ट्रांनाही सहानुभूतीची जरुरी असते. परंपरागत चालत आलेल्या पूर्वग्रहांपासून, रुढींपासून, बौद्धिक गुलामगिरीपासून मुक्त होण्यासाठी जी राष्ट्रे धडपडत आहेत, त्यांना सहानुभूती दाखविणे, त्यांना त्यांच्या त्या कामात मदत करणे, हे सुधारलेल्या राष्ट्रांचे कर्तव्य आहे. त्या धडपडणा-या राष्ट्रांवर उडी घालून त्यांचे धनी होऊ नका किंवा त्यांना आपल्या पंखाखाली घेऊ नका. पौर्वात्यांची जागृती म्हणजे युरोपवर संकट नव्हे. चीन धडपडत आहे; तेथे उलथापालथ होत आहे. हिंदुस्थानचे स्वातंत्र्य हा थोड्या कालावधीचा प्रश्न आहे. तुर्कस्थान, इराण, अफगाणिस्थान झपाट्याने अर्वाचीन व अद्ययावत् होत आहेत. हे सारे तर जगाच्या ब-यासाठीच आहे. दुस-यांचा विचार न करता कोणाही राष्ट्रास जगता येणार नाही. राष्ट्रांचे परस्परावलंबन प्रत्यही वाढत आहे. आणि जेथे जेथे अन्याय व जुलूम असतील तेथे तेथे त्यांच्याशी झगडावयास ‘मानवजातीच्या भवितव्या’ वरील अढळ श्रद्धेच्या जोरावर आपण उभे राहिले पाहिजे. पेटू दे ती ‘मानवजातीच्या भवितव्या’ वरील अढळ श्रद्धेची मंगल ज्योत सर्वांच्या हृदयात व होऊ दे सारे दास्य-दारिद्रय खाक!