Get it on Google Play
Download on the App Store

पुनर्रचना 21

मग ते हक्क स्त्रीचे असोत वा पुरुषांचे असोत. ‘स्त्री-पुरुष’ भेद येथे नाही. व्यक्ती कोणता धंदा करते, या गोष्टीलाही य़ेथे महत्त्व नाही. व्यक्तीत्व पवित्र आहे. प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या विशिष्टत्वाचा विकास करायला वाव असला पाहिजे. जे जे उत्कृष्टत्व मिळविण्याची प्रत्येकात पात्रता असेल, त्या त्या उत्कृष्टत्वाच्या जवळ जाणे मनुष्यास शक्य असले पाहिजे, ते ते पूर्णत्व, त्याला मिळविता येईल असे करता आले पाहिजे. लोकशाहीचा असा अर्थ नव्हे की, तत्त्वज्ञान, साहित्य, कला, शास्त्र, कायदा, राजकारण यांतील मुल्यांचा निर्णय करण्याची पात्रता सर्वांजवळ सारखी असते, ती कमीअधिक असते. कोणाचा एखाद्या बाबतीत अधिक विकास झालेला असतो, कोणाचा कमी झालेला असतो. प्रत्येकाचे प्रयत्न निराळे, गुणधर्म निराळे. आन्स्टाइनचा शोध बरोबर की चूक हे आपण सर्वींची मते घेऊन ठरवू शकणार नाही. मनुष्य म्हणजे विचार करणारा प्राणी अशी जरी व्याख्या असली, तरी सारे बुद्धीचा उपयोग करतातच, विचारपूर्वक वागतातच असे नाही आणि त्यांची बुद्धी सर्वच क्षेत्रांत अंकुठितपणे चालेल असेही नाही. लोकशाहीचा असा अर्थ नाही की, आपण सर्व बाबतीत समान आहोत. मनुष्यांत असमानता सदैव राहणारच. कोणी लठ्ठ असतील, कोणी काटकुळे असतील; कोणी उंच असतील, कोणी बुटबैंगण असतील; कोणी मोठे असतील, कोणी छोटे असतील. भेद कधीही नष्ट करता येणार नाहीत. त्याचप्रमाणे कोणत्याही सामाजिक संस्थेला वस्तुनिरपेक्ष अशी सर्वांना अगदी काटेकोर व तंतोतंत समान अशी संधी देता येणे शक्य नाही. मनुष्य कोणत्या सामाजिक स्थितीत आहे, त्या स्थितीची त्याच्यावर क्रिया-प्रतिक्रिया काय झाली आहे, होत आहे, या सर्वांवर दिलेल्या संधीचा तो कितपत उपयोग करुन घेईल हे अवलंबून राहिल. संधी मिळणेही या अशा अनेक गोष्टींवर अवलंबून असते. ‘परंतु सर्वांना समान संधी’ हे सामाजिक ध्येय निर्दोष आहे. अज्ञानाचे व दारिद्र्याचे अडथळे आपण दूर केले पाहिजेत. थोर कला व वाङमय यांना मनुष्याच्या हृदयात खोल जाण्यास अवसर दिला पाहिजे. त्यांची पाळेमुळे खोलवर जातील असे केले पाहिजे. देशाचा सांस्कृतिक दर्जा आपण वाढविला पाहिजे. प्रत्येकाला स्वतःचे स्व-स्वरुप पाहता येईल, स्वतःचा विकास करुन घेता येईल असे केले पाहिजे. प्रत्येकाच्या जीवनात भावना, विचार व कृती यांची एकता राहील असे वातावरण निर्मिले पाहिजे. लोकशाही म्हणजे काही सहजस्थिती नव्हे. हे ध्येय आहे; आणि हे ध्येय प्रयत्नाने व शिक्षणाने साध्य करायचे आहे. राजकीय दृष्ट्या लोकशाही आज तितकीशी यशस्वी नाही, याचे मुख्य कारण मतदार आपले मत विचारपूर्वक व प्रामाणिकपणे देत नाहीत हे आहे. मतदारांची बुद्धी वाढली पाहिजे व पुढा-यांचा प्रामाणिकपणा वाढला पाहिजे. असे होईल तर लोकशाही अधिक यशस्वी होईल. ध्येयभूत पूर्णतेच्या दृष्टीने आजची लोकशाही जरी हिणकस ठरली, तरी भूतकालीन राज्यपद्धतीपेक्षा ती शतपटीने बरी. अर्थातच काही अनियंत्रित राजे असेही झाले की, ते अति उदार होते; त्यांच्या कारकीर्दीत लोकांना सुख व शांती यांचा लाभ झाला. परंतु ते अपवाद आपण सोडून देणेच बरे. लोकशाहीत सार्वजनिक शांती व सुस्थिती अधिक राहते. कारण मतदारांना राज्यकारभाराला दिशा दाखविण्याची जी सत्ता असते, तीमुळे ते आपले असमाधान प्रकट करतात. मनातील कुरुबुरी, असंतोष चर्चेच्या वेळेस प्रकट होतात. मनातील सारे ओकले जाते. मनातील जमलेल्या वृत्तींना व विचारांना प्रकट होण्यास हा जो वाव मिळतो, त्याने सार्वजनिक आरोग्य राहायला मदत होते. समाज नीटनेटका व जरा सुखासमाधानाने राहतो.

संस्कृतीचे भवितव्य

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
'कल्की'च्या निमित्ताने 1 'कल्की'च्या निमित्ताने 2 'कल्की'च्या निमित्ताने 3 'कल्की'च्या निमित्ताने 4 प्रास्ताविक 1 प्रास्ताविक 2 प्रास्ताविक 3 प्रास्ताविक 4 सर्वत्र नकार 1 सर्वत्र नकार 2 सर्वत्र नकार 3 सर्वत्र नकार 4 सर्वत्र नकार 5 सर्वत्र नकार 6 सर्वत्र नकार 7 सर्वत्र नकार 8 सर्वत्र नकार 9 सर्वत्र नकार 10 सर्वत्र नकार 11 सर्वत्र नकार 12 सर्वत्र नकार 13 सर्वत्र नकार 14 प्रश्न 1 प्रश्न 2 प्रश्न 3 प्रश्न 4 प्रश्न 5 प्रश्न 6 प्रश्न 7 प्रश्न 8 प्रश्न 9 प्रश्न 10 पुनर्रचना 1 पुनर्रचना 2 पुनर्रचना 3 पुनर्रचना 4 पुनर्रचना 5 पुनर्रचना 6 पुनर्रचना 7 पुनर्रचना 8 पुनर्रचना 9 पुनर्रचना 10 पुनर्रचना 11 पुनर्रचना 12 पुनर्रचना 13 पुनर्रचना 14 पुनर्रचना 15 पुनर्रचना 16 पुनर्रचना 17 पुनर्रचना 18 पुनर्रचना 19 पुनर्रचना 20 पुनर्रचना 21 पुनर्रचना 22 पुनर्रचना 23 पुनर्रचना 24 पुनर्रचना 25 पुनर्रचना 26