प्रास्ताविक 3
ही पृथ्वी फार मोठी आहे असे नाही. या लहानशा पृथ्वीवर नाना जाती, जमाती, नाना धर्म, नाना राष्ट्रे जवळजवळ नांदत आहेत. परंतु जीवन सुंदर होण्यासाठी लागणारा बंधुभाव त्यांच्याजवळ नाही. आपण एकमेकांचे शत्रू आहोत, प्रतिस्पर्धी आहोत असेच उलट त्यांना वाटते. मानवजातीने बाह्यतः एक शरीर धारण केले असले तरी आतील आत्मा एक आहे असे नाही. आतील प्रेरक विचार एक आहे असे नाही. मानवजातीचे मन आज समान नाही.
स्पेंग्लर या सुप्रसिद्ध लेखकाने ‘पश्चिमेचा –हास’ म्हणून एक ग्रंथ लिहीला आहे. त्यात तो म्हणतो, ‘निरनिराळ्या राष्ट्रांची निरनिराळी संस्कृती असते. त्या संस्कृतीही निरनिराळ्या ध्येयांना जन्म देत असतात,’ स्पेंग्लरने मांडलेली ही विचारसरणी मोठी धोक्याची आहे. एक सर्वसामान्य अशी मानवी संस्कृती निर्माण करण्याची आशा अशा विचारप्रसादात नष्ट होते. ‘प्रत्येक जात, प्रत्येक संस्कृती जन्मास येते, वाढते व नष्ट होते. हे रहाटगाडगे सारखे सुरु आहे,’ असे स्पेंग्लरने गृहीत धरले आहे. परंतु स्पेंग्लरचे हे म्हणणे ऐतिहासिक सत्याला धरुन आहे असे नाही. भूतकाळात कदाचित त्या त्या भागांत स्थानिक व प्रादेशिक संस्कृती एका पाठोपाठ एक जन्माला आल्या असतील, वाढल्या असतील, नष्ट झाल्या असतील. आपल्या मरणानंतर त्यांनी आपली सांस्कृतिक पुंजी नवीन तरुण पिढीच्या स्वाधीन केली असेल. परंतु आजच्या काळात अशा प्रादेशिक संस्कृतींना वाव नाही. प्रादेशिक संस्कृतींचा काळ संपला आणि मानवजातीचा इतिहास प्रथम एका अखंड प्रवाहाने जात होता, परंतु मागून एकमेकांची वैशिष्ठ्ये व पृथकत्वे दिसून आल्यामुळे अलग अलग असे त्याचे तुकडे झाले, असेही निश्चितपणे मानणे योग्य होणार नाही.
उलट, इतिहासाच्या अध्ययनावरुन असे दिसते, की भिन्न भिन्न संस्कृती आपापल्या विकासनियमानुसार ब-याच काळापर्यंत निरनिराळ्या रीतीने वाढल्या. आणि नंतर हळूहळू एकमेकींच्या जवळ येऊ लागल्या. आणि आता तर एकत्र येऊन त्या सर्वांचा एक महान संयुक्त संस्कृतीप्रवाह बनेल, असे स्वच्छ दिसत आहे. स्पेंग्लर म्हणतो की, ‘नियतीनियमानुसार युरोप आपल्या वृद्धावस्थेतून जात आहे आणि युरोपला वाचवणे म्हणजे वेडेपणा आहे.’ त्याच्या म्हणण्यात एक सत्य आहे. परंतु ते सत्य स्पेंग्लरच्या ध्यानात आलेले नाही. युरोप जगापासून अलग राहून आपली विशिष्ट संस्कृती राखू पाहील तर ते आता जमणार नाही.आता जीवनाच्या कलेत आपण प्रादेशिक प्रयोग करीत नाही बसणार. आता जागतिक प्रयोग करु. हे एक महान सत्य स्पेंग्लरच्या विचारसरणीत आहे. कोणत्याही एका विशिष्ट प्रादेशिक संस्कृतीला वा सभ्यतेला संपूर्णपणे विश्वव्यापक होता येणार नाही. प्रत्येक संस्कृती म्हणजे त्या त्या मानववंशातील जिवंत शक्तीचे प्रकट स्वरूप. आपणास या सांस्कृतिक गोष्टींचा विचार करताना इतिहासालाच फक्त प्रमाण मानून चालले पाहीजे. इतिहास हेच आपले तर्कशास्त्र आणि इतिहासाला केवळ वस्तुस्थितीनिरपेक्ष असा विश्वात्मक परिपूर्ण मानव माहीत नाही. आणि म्हणूनच कोणतीही संस्कृती केवळ स्वतःपुरते पाहून परिपूर्ण होणार नाही, विश्वव्यापक होणार नाही. भावी संस्कृतीने मानवी जीवनाची सर्वव्यापक अशी कल्पना घेऊन उभे राहिले पाहीजे.