प्रास्ताविक 4
मनुष्याची दृष्टी संकुचित न ठेवता भावी संस्कृतीने ती विश्वाकार केली पाहीजे. प्रादेशिक संस्कृतींनी मानवजातीचे खरे कल्याण सदैव केलेले आहे असे नाही. भूतकाळात पाहा किंवा आजही पाहा, संकुचित संस्कृतींनी धार्मिक, राजकीय व जातीय अशी विशिष्ट वर्चस्वे स्थापिली. पुरुषांची स्त्रियांवर सत्ता, श्रीमंतांची गरिबांवर सत्ता, असले प्रकार त्या संस्कृतींतून निर्माण झाले. अशा प्रकारांना त्या त्या स्थानिक संस्कृतींनी पाठिंबा दिला. सर्व मानवजातीला शोभेल अशी शाश्वत व स्थिर संस्कृती निर्मिण्यापूर्वी प्रत्येक संस्कृतीने आपल्या उणिवा व आपल्या मर्यादा ओळखणे जरुर आहे. कोणतीही एकच संस्कृती मानवजातीचे ध्येय होऊ शकणार नाही, हे सर्वांनी नम्रपणे ध्यानात घेणे अगत्याचे आहे.
यांत्रिक शोधांतील विजयामुळे भावी संस्कृतीला एक सर्वसामान्य असा पाया मिळत आहे. या पायावर आध्यात्मिक ऐक्याची इमारत उभारण्यासाठी परंपरागत आलेल्या दुष्ट विचारसरणींचा, नाना भ्रामक कल्पनांचा व दुष्ट आचारांचा नायनाट झाला पाहीजे. सर्व राष्ट्रांतून या गोष्टीला आरंभ झालेला आहे. विशेषतः दुस-याच्या हातातील बाहुली होण्याचे नाकारणा-या तरुणांत ही नवीन दृष्टी येत आहे. आज विचाराला जोराची चालना मिळाली आहे. ज्या कल्पना, जे विचार, जी ध्येये आजपर्यंत उराशी बाळगली, त्यांत काही तरी कमी आहे, त्यांत काही तरी असमाधानकारक आहे, असे सर्वांना वाटू लागले आहे. नवीन मूल्यांचा शोध करण्यासाठी धडपड होऊ लागली आहे. वातावरणात ‘इन्किलाब’ ची गर्जना घुमत आहे. मोडतोड करु पाहण्याची वृत्ती बळावत आहे. धर्माची पूरातन रुपे कोलमडून जात आहेत. रुढींचे डोलारे ढासळू बघत आहेत. प्रत्येक देशातील व प्रत्येक धर्मपंथातील विचारवंतांच्या मनात काही तरी नवीन जन्माला येणार अशी उत्सुकता वाढत आहे. ते आशेने, अपेक्षेने बघत आहेत.
माथेफिरुंची गोष्ट सोडून देऊ. आपलेच म्हणणे खरे असे हटवादाने म्हणणा-या धर्मवेड्यांची गोष्ट सोडून देऊ. अशांजवळ चर्चा करण्यात अर्थही नसतो. परंतु प्रत्येक संस्कृतीच्या विचारवंत पुरस्कर्त्यांना आज एक गोष्ट स्पष्टपणे पटू लागली आहे, की मानवजात अलग नसून अखंड आहे. तिच्या सर्व इतिहासात, तिच्या सर्व घडामोडीत केवळ पृथकत्व नाही. ही अखंड मानवजात सारखी पुढे जाईल. तिच्या प्रगतीला कोण रोखील, कोण मर्यादा घालील ? दिवसेंदिवस मानवजातीचे हे वैभव वाढत आहे. व त्या वाढत्या वैभवाकडे आदराने व भक्तीने ती जात आहे. थोर इटॅलियन कवी डान्टे म्हणाला होता, “या संस्कृतीसाठी एक ध्येय व त्या संस्कृतीसाठी दुसरे, असे असू शकणार नाही. परंतु सर्व मानवजातीची म्हणून जी संस्कृती आहे तिला एकच एक ध्येये असू शकते.” सर्वांची म्हणून जी संस्कृती तिचे जरी एकच गंतव्य व प्राप्तव्य असले तरी त्याचा अर्थ असा नाही, की सारे एकच भाषा बोलतील, सारे एकाच धर्माचे असतील; सारे एकाच राज्यतंत्राखाली असतील, किंवा सर्वांच्या चालीरीती एकाच ठरीव साच्याच्या असतील. सांस्कृतिक ऐक्य बाह्य सारखेपणात पाहायचे नसून विविधतेतील अविरोधात पाहावयाचे आहे. भिन्न भिन्न ध्येयांचे व प्रकृतीचे लोक एकत्र आले, एकमेकांत मिसळले व त्या मिश्रणातूनच कोणतीही महान संस्कृती निर्मिली गेली असा इतिहास आहे. मिसर देश घ्या किंवा बाबिलोन घ्या, चीन घ्या की हिंदुस्थान घ्या, ग्रीस घ्या की रोम घ्या, सर्वांच्या संस्कृतीच्या इतिहासातून हेच एक सत्य प्रतीत होत आहे. सांस्कृतिक ऐक्य घडवू पाहणा-यांचे क्षेत्र आज अधिक विस्तृत झाले आहे. आज सारे जग समोर उभे करावे लागते. आपणाला एकमेकांत विलीन व्हायचे नसून एकमेकांशी सहकार करावयाचा आहे. आपल्या बंधूंचे अनुकरण करायचे नसून त्यांना वाव द्यायचा आहे; आपलेच म्हणणे खरे असे मानायचे नसून दुस-यांना सहानुभूती दाखवायची आहे; अशा त-हेची वृत्ती असणे, अशी वृत्ती उत्पन्न होणे, हीच भविष्यकाळाची आशा; हीच भविष्यकाळाची श्रद्धा.